जालना येथे मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यावर सगळे विरोधकही चार्ज झाले. प्रथम शरद पवार नंतर उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, संजय राऊत अशी सगळी मंडळी तातडीने जालन्याला रवाना झाली. तिथे आंदोलकांशी संवाद साधला आणि मग आपणच कसे मराठा आरक्षणाचे खरे कैवारी आहोत, हे सांगण्याचा अट्टहास सुरू झाला. त्याचवेळी एक बातमी मात्र फारशी कुठे चर्चेत आली नाही ती म्हणजे शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा अडविण्यात आला आणि त्यातील एका गाडीचे नुकसानही झाले. शिवाय, शरद पवार परत जा परत जा, तुम्ही ४० वर्षे होतात तुम्ही काय केलेत असे सवाल विचारणाऱ्या घोषणाही आंदोलकांकडून देण्यात आल्या. याचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला पण त्याची फारशी कुणी दखल घेतली नाही.
शरद पवारांनी या आंदोलकांची भेट घेत त्यांना आश्वासन दिले पण त्यावेळीही हा गोंधळ सुरू होता. एकीकडे महाविकास आघाडीचे हे नेते आंदोलकांना भेटताना आपण कसे मराठा आरक्षणासाठी झटलो, उद्या सरकार आल्यावरही आम्ही हे आरक्षण मिळवून देऊ असे सांगत होते पण त्यांच्याकडे सत्ता असताना मात्र त्यांना हा चमत्कार काही करून दाखवता आला नाही.
हे ही वाचा:
जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर
अदानी-अंबानींना लक्ष्य करून देशाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न
भिवंडीत दुमजली इमारत कोसळून दोघींचा मृत्यू, चौघे जखमी
लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार
शरद पवारांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली तेव्हाही त्यांनी पुन्हा चारवेळा आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिल्याचा उल्लेख केला. पण या चार वेळा मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठ्यांची नेमकी स्थिती काय आहे, हे पाहिले गेले नाही. त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही म्हणूनच आज आंदोलक पवारांविरोधात घोषणा देत आहेत. शरद पवार हे मराठ्यांचे नेते आहेत असे त्यावेळी पवारांबद्दल बोलले जात होते पण मराठ्यांच्या अवस्थेकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत गेले. आज जे एक मराठा लाख मराठा या घोषणा दिल्या जात आहेत त्या काही वर्षांतल्या आहेत पण त्याआधीपासून मराठ्यांची अवस्था ही खालावत गेली असली पाहिजे. तेव्हा मराठा मुख्यमंत्रीच महाराष्ट्राला लाभले. पण त्यांनी नेमके मराठ्य़ांसाठी काय केले, हाच सवाल या मराठा आंदोलकांच्या मनात आहे. त्यातूनच पवारांविरोधात या घोषणा दिल्या जात आहेत.
अशोक चव्हाणही या आंदोलकांना भेटायला गेले होते. तेव्हा तेही म्हणाले की, महाविकास आघाडी तुम्हाल आरक्षण मिळवून देणार. तेव्हा प्रश्न मनात येतो की, अशोक चव्हाण हेसुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा त्यांना मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कुणीही रोखले नव्हते. निदान मराठ्यांचे काही प्रश्न आहेत याचीही तेव्हा दखल घेतली गेली नव्हती. आज फडणवीस यांनी या लाठीचार्जनंतर राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. पण त्याच फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हे आरक्षण मिळाले होते. १६ टक्के आरक्षणाचा निर्णय त्या सरकारने घेतला होता आणि मुंबई उच्च न्यायालयात तो टिकवूनही दाखविण्यात आला. नंतर मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आणि तिथे ते अडकून पडले ते आजतागायत. मग नेमके त्यावेळी मराठा आरक्षणासाठी काही करण्याची संधी महाविकास आघाडीला होती ती का साधण्यात आली नाही, असा प्रश्न जर आंदोलकांच्या मनात येत असेल तर त्यात चुकीचे काय?
खरे तर आज हे सगळे विरोधक तिथे जात आहेत, त्यांना खरोखरच आंदोलकांबद्दल काही चिंता असेल तर या प्रश्नाचे राजकारण करून सरकार खाली पाडण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्यापेक्षा आपण कशापद्धतीने हा प्रश्न सोडविणार आहोत, याबद्दल बोलले पाहिजे. पण त्यांच्याकडून याबद्दल कोणतेही पर्याय सुचविले जात नाहीत कारण त्यांना हा प्रश्न सुटावा असे मनापासून वाटत नाही. त्यापेक्षा हे प्रकरण कसे तापेल यादृष्टीनेच हे सगळे नेते प्रयत्न करत आहेत की, काय अशी शंका घेण्यास वाव आहे.
लाठीचार्जसाठी पोलिसांना कुठूनतरी अदृश्य फोन आला, वरून आदेश आला, वगैरे भाषा करून विरोधक सरकारला अडचणीत आणण्यात कदाचित यशस्वी होतील पण त्यातून हा प्रश्न मात्र कधीही सुटणार नाही. मात्र हा प्रश्न सोडवायचाच नसल्यामुळेच सगळे नेते अगदी तातडीने या आंदोलकांना भेटण्यास गेले. मागे महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळ आंदोलन झाले पण तेव्हा त्यांना भेटण्यासाठी यापैकी कुणालाही वेळ मिळाला नाही. उलट तेव्हा शरद पवारांच्या घरावर गेलेल्या आंदोलकांना पकडून तुरुंगात डांबण्यात आले, तेव्हा या कर्मचाऱ्यांप्रती कोणतीही सहानुभूती दाखविण्यात आली नाही. एकूणच विरोधकांचे हे आंदोलकांप्रती असलेले अश्रु हे मगरीचे अश्रु आहेत याच शंका नाही.