रेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या? याचे थक्क करणारे स्पष्टीकरण

रेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या? याचे थक्क करणारे स्पष्टीकरण

पुण्यातील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धावपटूंच्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या क्रीडा आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची गाडी तिथे पार्क करण्यास परवानगी देण्यात आली होती, असं उत्तर ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणावर विरोधक आणि समाज माध्यमांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

“सिमेंट ट्रॅकवर गाड्या पार्क करण्याची परवानगी देण्याचं कारण म्हणजे पवार साहेबांच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांना चालायला त्रास होऊ नये, म्हणून संमती देण्यात आली होती.” असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे. दुर्दैवाने गाड्या रेसिंग ट्रॅकवर उभ्या केल्या गेल्या. त्याबद्दल आपण माफी मागतो. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असं आश्वासनही बकोरिया यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिलं.

पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेस ट्रॅकवर गाड्या पार्क करुन क्रीडा सुविधांचं नुकसान केलं आहे, असा आरोप पुण्यातील भाजपा  नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

हे ही वाचा:

ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा

पुलावामाध्ये माजी एसपीओची दहशतवाद्यांकडून हत्या

नव्या निर्बंधांविरुद्ध व्यापारी ‘या’ शहरांमध्ये आक्रमक

ओवैसी उत्तर प्रदेशात शंभर जागांवर निवडणूका लढवणार

२६ जूनला शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवारांसह काँग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पार्क केल्यामुळे टीकेची झोड उठली होती.

Exit mobile version