देशातील प्रतिष्ठेचे मंत्रालय असणाऱ्या रेल्वे खात्याची सूत्रे नवनिर्वाचित मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच स्वीकारली. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांच्या आणि एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळाभेटीचा प्रसंग चांगलाच चर्चेत आहे. शुक्रवारी अश्विनी वैष्णव आपल्या कार्यालयात आले तेव्हा त्यांनी सिग्नल विभागात काम करणाऱ्या एका अभियंत्याची आवर्जून भेट घेतली. हा अभियंता आणि अश्विनी वैष्णव यांनी जोधपूरच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. हा अभियंता आपल्याच महाविद्यालयातील आहे, ही बाब अश्विनी वैष्णव यांना समजल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याची गळाभेट घेतली. आम्ही महाविद्यालयात असताना कनिष्ठ इयत्तांमधील विद्यार्थी वरिष्ठांना बॉस म्हणून संबोधत. त्यामुळे तू देखील आता मला बॉसच म्हण, असे अश्विनी वैष्णव यांनी मस्करीत कर्मचाऱ्याला सांगितले.
अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आता रात्री १२ वाजेपर्यंत काम करताना दिसणार आहेत. मात्र, हा आदेश केवळ मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट ही सकाळी ७ वाजता सुरू होईल. ही शिफ्ट दुपारी ४ वाजता संपेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १२ वाजता संपेल. हा आदेश केवळ एमआर सेलला (मंत्री कार्यालय) लागू राहणार आहे. सर्व रेल्वे कर्मचारी किंवा खासगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजीपीआर डीजे नारायण यांनी दिली.
हे ही वाचा:
‘या’ बँकेचं १००% खासगीकरण होणार
तीन महिन्यांच्या मुलीला पुरणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक
‘शरद पवार हाजीर हो’…कोरेगाव भीमा प्रकरणात लवकरच नोंदवणार साक्ष
राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेले ५१ वर्षी वैष्णव हे १९९४ च्या बॅचचे ओडिशा कॅडरमधील आयएएस अधिकारी आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळवल्यानंतरही त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांचं समर्थन मिळवलं होतं. त्यावेळी बीजू जनता दलाच्या अनेक नेत्यांनी पटनायकांवर टीकाही केली होती.