स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा सातत्याने अर्वाच्य आणि घाणेरड्या शब्दांत अपमान करणाऱ्या काँग्रेसला आता दादरच्या सावरकर स्मारकात रस वाटू लागला आहे. दादर येथील हे स्मारकंच घशात घालण्याच्या तयारीला काँग्रेस लागली आहे, अशी शंका सदस्य व्यक्त करत आहेत.
येत्या २६ डिसेंबरला होत असलेल्या सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते दीपक टिळक उभे राहात आहेत. लोकमान्य टिळकांचे पणतू असलेले दीपक टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. सावरकरांची जाहिररित्या बदनामी करणाऱ्या काँग्रेसचा एक नेता सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी का उभा राहात असेल, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या काँग्रेसच्या शिदोरी या नियतकालिकात सातत्याने वीर सावरकरांविरोधात अपमानजनक वक्तव्ये करण्यात आली आहेत. राहुल गांधी यांनीही वारंवार सावरकरांचा अपमान केलेला आहे. अशा सावरकरविरोधी काँग्रेसच्या नेत्यांना स्मारकाचा पुळका का आला, असा प्रश्न स्मारकातील सदस्यांकडून विचारला जात आहे.
दीपक टिळक यांनी या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. २६ डिसेंबरला ही अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित हेदेखील अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
सावरकर स्मारक हे दादरच्या समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा मोक्याच्या जागेवर अनेकांचा डोळा असल्याचे सदस्य सांगतात. स्मारकासाठी आता जादा चटईक्षेत्रही मिळत आहे. त्यामुळे स्मारकात कधीही न आलेल्यांना स्मारकाची आता ओढ वाटू लागली आहे, असेही बोलले जाऊ लागले आहे. शेजारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक यामुळे हा विभाग केंद्रस्थानी असेल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर स्मारकाच्या वतीने खटला गुदरण्यात आलेला आहे. ही याचिका मागे घेण्यासाठी दीपक टिळक यांच्या रूपात हे प्रयत्न चालले आहेत का, असाही सवाल विचारला जात आहे.
हे ही वाचा:
चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी
ओमिक्रोन विरुद्धच्या लढाईसाठी मोदींची ‘पंचसूत्री’
लसीकरण न झालेल्यांना ते देत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी वळल्या गठड्या
एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, दीपक टिळक हे कशाकरता येत आहेत स्मारकात. लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक, इंदिरा गांधी यांच्या काळात सावरकरांचा आदर केला जात होता. पण आता अर्वाच्य भाषेत काँग्रेसचे नेते सावरकरांना बोलतात.
यासंदर्भात टिळक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्न पाठविण्यात आले पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.