एम पूर्व विभागातील वीर जिजामाता मार्गावरील उड्डाणपुलाचे काल १ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. पण या उड्डाणपुलाच्या कोनशिलेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नाही, असा खरमरीत सवाल भाजपाने विचारला आहे.
मोठा गाजावाजा करत सत्ताधारी शिवसेनेने काल पुलाचे उदघाटन केले. मात्र या पुलावर बसवण्यात आलेल्या नामकरण कोनशिलेवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवसेना सत्ताधारी उड्डाणपुलास देऊ शकली नाही, ही बाब निश्चितच समस्त महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे, अशी भावना खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केली.
सहा किलोमीटर लांब घाटकोपर मानखुर्द जोडमार्गाचे नामकरण ‘वीर जिजामाता भोसले मार्ग’ असे महापालिकेच्या ठरावाद्वारे करण्यात आले आहे. सदर पुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यासाठी स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी ९ डिसेंबर २०२० ला प्रस्ताव दिला होता आणि आठ महिन्यानंतर अद्यापही हा प्रस्ताव महापालिकेतच प्रलंबित आहे. ३० व ३१ जुलै रोजी महापालिकेची सभा घोषित करून अनाकलनीय कारणासाठी रद्द करण्यात आली.
हे ही वाचा:
…आणि दोघांनीही विभागून घेतले सुवर्णपदक
अनिल देशमुख यांची पुन्हा हुलकावणी
‘या’ देशातही होणार कोवॅक्सिनची चाचणी
पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?
मुंबई महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे की, या संपूर्ण सहा किलोमीटरच्या रस्त्यावर एकाही ठिकाणी ‘वीर जिजामाता भोसले मार्ग’ असा नामफलक लावलेला नाही हे ही दुर्दैव आहे.
महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना किमान छत्रपती शिवाजी महाराज, वीर जिजामाता भोसले यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या नामकरणाबाबत तसेच त्यांच्या नामफलकाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सुबुद्धी आई भवानी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशी भावना भाजपा नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केली.