निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात सोमवार, १८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. “तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण, त्यावर सुनावणी झाली नव्हती.
सोमवारी पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे लांबणीवर गेली असून तीन आठवड्यानंतर होणार आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. यावेळी, “तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती आणि याचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला.
हे ही वाचा:
भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांना अटक
रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे
सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !
कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आठवड्याभरात निकाल देण्याचे निर्देश
सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. “११ मे च्या निकालानंतर काहीही झालेलं नाही. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटलं होतं. पण, ११ मेनंतर काहीही झालं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाला उत्तरदायी आहेत. तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावं लागेल. एक आठवड्यात सुनावणी घ्या. दोन आठवड्यात काय कारवाई केली, ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल राहुल नार्वेकरांना विचारणा केली असता ते म्हणाले की, “याबद्दल माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयाची प्रत आलेली नाही. ती मिळाली की मी ती वाचेन आणि नंतर त्यानुसार कारवाई होईल. तोपर्यंत मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. तुम्ही जे विचारत आहात तशी माहिती आता तरी माझ्याकडे नाही,”असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.