विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत बोलत असताना ठाकरे सरकारचा समाचार घेतला. फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. यामध्येच त्यांनी मला हे सरकार ‘नारायण भंडारी’ सारखे वाटते असा टोला सरकारला लगावला. नारायण भंडारी म्हणजे काय?
हे ही वाचा:
देवेन्द्र फडणवीसांनी एक गोष्ट सांगत सरकारवर हल्ला केला. त्यात ते असं म्हणाले, “एकदा एका शाळेचा मॉनिटर निवडायचा असतो. मॉनिटर निवडायला मास्तर आले. मास्तरांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला सुरवात केली. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं, तू शाळा सुटल्यावर काय करतोस? पहिला विद्यार्थी म्हणाला नारायण भंडारीच्या घरी जातो आणि बाबांसाठी भांगेची गोळी घेऊन येतो. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारतात, तो म्हणतो मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि माझ्या वडिलांसाठी हातभट्टीची खंबा घेऊन येतो. तिसऱ्या विद्यार्थ्याला विचारतात, तो म्हणतो मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि बाबांच्या चिलमीत गांजा भरून घेतो. गुरुजी प्रचंड नाराज होतात. एक चांगला मुलगा बसलेला असतो त्याला विचारतात, तर हा चौथा मुलगा म्हणतो, मी घरी जातो, हात पाय धुतो, थोडं खातो, देवाजवळ दिवा लावतो, प्रार्थना स्तोत्र म्हणतो, अभ्यास करतो, आई वडिलांना थोडी मदत करतो आणि त्यानंतर मी माझं सगळं काम करतो. गुरुजी आनंदी होतात आणि म्हणतात वर्गाचा मॉनिटर यालाच करायचंय. काय नाव आहे बाळा तुझं?मुलगा म्हणतो नारायण भंडारी.”