देशातील पाच राज्यात निवडणुका पार पडल्या आणि या निमित्ताने काही राजकीय मोठ्या घडामोडीही झाल्या. त्यापैकी एक म्हणजे तेलंगणातील सत्ता काँग्रेसच्या हाती गेली. यामुळे कर्नाटकनंतर तेलंगणा हे दाक्षिणात्य राज्य काँग्रेसच्या पारड्यात गेलं आहे. भाजपा, बीआरएस, काँग्रेस आणि एआयएमआय या चौघांमध्ये ही लढत झाली. परंतु, काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवण्यास यश आलं आहे. केंद्रीय निवडणूक आय़ोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला ६६ जागा, बीआरएस ३९, भाजपा ८ आणि एआयएमआयएमला ७ जागा मिळाल्या आहेत.
या काळात कॉंग्रेसकडून एक नवा चेहरा समोर आला तो म्हणजे रेवंत रेड्डी यांचा. ५४ वर्षीय रेड्डी यांनी तेलंगणात विजयी मोहिमेचे नेतृत्व केले. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी या निवडणुकीत पक्षाचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. शिवाय काँग्रेस आता सत्तेत आल्याने रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सुद्धा पुढे आले आहेत.
रेवंत रेड्डी हे १७ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. मल्काजगिरी मतदारसंघातून विजय मिळवत त्यांनी संसदीय कामकाजात प्रवेश केला. याआधी रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात होते. टीडीपीकडून आमदारकी लढवताना रेड्डी यांनी पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता. २०१४ सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर २०१७ मध्ये त्यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना २०२१ मध्ये प्रदेशाअध्यक्ष केले.
रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. पुढे २००७ साली रेड्डी यांना अपक्ष उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश विधानपरिषदेवर सदस्य म्हणून संधी मिळाली. आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
जुलै २०२१ मध्ये तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर, रेड्डी हे अधिकाधिक ग्राउंड लेव्हलवर काम करताना दिसत होते, त्यांनी सत्ताधारी बीआरएस सरकारच्या विरोधात अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
हे ही वाचा:
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!
केसीआर यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून हायकमांडने रेड्डी यांची निवड करणे ही राज्याच्या निवडणुकीच्या रणनीतीमधील त्यांची प्रतिमा वाढवण्याची स्पष्ट चाल होती. कामरेड्डी मधून ते आघाडीवर आले आहेत, जो बीआरएसचा बालेकिल्ला आहे. २०१४ मध्ये तेलंगणा आंध्र प्रदेशातून वेगळे झाल्यापासून या भागातील जनतेने बीआरएसची साथ सोडली नव्हती.