पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचार उसळला असून या दरम्यान हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सर्वत्र टीका होत असताना आता ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनीही पश्चिम बंगालमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांचे कान टोचत म्हटले आहे की, हिंदू मतदार आता तृणमूल काँग्रेसला मतदान करणार नाहीत. तेथील लोक चिंतेत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, ममता बॅनर्जी या बंगालच्या हिंदू समुदायासाठी धोका बनल्या आहेत. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू न केल्याबद्दलही मिथुन यांनी ममता यांच्यावर निशाणा साधला. एक असा कायदा जो भारताच्या संसदेत मंजूर झाला आहे. तो लागू न करण्याचा अधिकार ममतांना कुणी दिली? त्या केवळ एक मुख्यमंत्री आहेत. त्या संविधानापेक्षा मोठ्या नाहीत. ममता बॅनर्जी संविधानापेक्षा वरच्या आहेत का? त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा संतप्त सवाल मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत राज्यातील जातीय हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “भाजप नव्हे तर ममता बॅनर्जी जातीय तणाव पसरवत आहेत. समुदायांमध्ये फूट पाडण्याचे काम त्या करत आहेत. बंगाली हिंदू आता बेघर आहेत आणि मदत छावण्यांमध्ये खिचडी खात आहेत. त्यांचा काय दोष आहे?” अशी टीका मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबादमधील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे म्हटले होते. शिवाय यामागे बीएसएफ, केंद्रीय एजन्सी आणि भाजपचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र मिथुन चक्रवर्ती यांनी ममतांचे हे विधान दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आणि मुख्यमंत्री जाणूनबुजून मुस्लिम समुदायाची दिशाभूल करत असल्याचे म्हटले.
हे ही वाचा :
‘वक्फ सुधारणा विधेयक’: सर्वोच्च न्यायालयाकडून कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती नाही!
एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पढण्याची केली गेली सक्ती!
गुगलकडून भारतातील २९ लाख जाहिरातदारांची खाती निलंबित; कारण काय?
“तो पुन्हा येतोय… वेगाचा कहर घेऊन!”
पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांबद्दल मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, लष्करी आणीबाणीत निवडणुका घ्याव्यात. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंत आणि त्यापूर्वी एक महिना राज्य लष्कराच्या नियंत्रणाखाली ठेवावे. राज्यातील निवडणुकीदरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल मिथुन यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी राज्य पोलिसांनाही प्रश्न विचारला आणि ते फक्त दंगली दरम्यान कार्यक्रम पाहण्यासाठी येतात असे म्हणत त्यांनी टीका केली.