अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे याच्या प्रकरणात विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर हल्ले चढवले आहेत. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणात एका टीव्ही चॅनेलसोबत बोलताना ‘हे गुन्हेगाऱ्यांचं, बलात्काऱ्यांचं आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांचं सरकार आहे’ अशी सडकून टिका केली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सरकारमधील सर्व महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर सरकारच्या सचिन वाझे प्रकराणातील भुमिकेवरून भातखळकर यांनी सरकारला लक्ष्य केले.
सरकार म्हणजे नाटक कंपनी, मनसुख हिरेनला न्याय मिळेपर्यंत प्रकरण लावून धरणार
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सचिन वाझे प्रकरणात एका टिव्ही चॅनेलला प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी सकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ‘सरकार नाटक कंपनी आहे. शरद पवार नाराज, अमूक नाराज, आता कारवाई करणार अशा बातम्या सोडून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे’ असे सांगितले. त्याबरोबरच ‘मुख्यमंत्र्यांनी एपीआय सचिन वाझेवर खंडणीचा गुन्हा असताना सुद्धा पुन्हा सेवेत का घेतलं? याचा खुलासा झाला पाहिजे. सेवेत घेतल्यानंतर इतकी महत्त्वाची पोस्ट का दिली? हे देखील सांगितलं पाहिजे.’ अशी मागणी देखील केली. ही सगळी सगळी नौटंकी चालू असल्याचं देखील ते म्हणाले. यावेळी, ‘सरकारला वाटत असेल की संजय राठोड प्रकरण विसरले असतील, परंतु अजूनही त्यांच्यावर एफआयआर दाखल झालेली नाही’ हे सुद्धा भातखळकरांनी आवर्जून सांगितले. ‘मनसुख हिरेन यांना न्याय मिळेपर्यंत हा मुद्दा लावून धरणार.’ असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
खारफुटीच्या कत्तलीवर तथाकथित पर्यावरणप्रेमींचे मौन
वॅक्सीन गोदामात ठेऊन ठाकरे सरकार करतय लॉकडाऊनचा विचार
सचिन वाझे याचा बोलविता धनी कोण?
‘सचिन वाझेचा बोलविता धनी कोण? याची चौकशी व्हायला हवीट अशी मागणी त्यांनी केली. विधानसभेत विरोधी पक्षांनी सरकारवर सगळे आरोप केल्याचे आणि आता ते सिद्ध होत असल्याचे देखील ते म्हणाले. ‘सचिन वाझे याच्या निलंबनामुळे मुख्यमंत्र्यांची अवस्था गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं अशी झाल्याचे ते म्हणाले. सचिन वाझेने गाडी स्वतः चालवली, त्या गाडीची नंबर प्लेट बदलली, खोटी नंबर प्लेट बनवून घेतली, स्वतःच्या सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज नष्ट केलं, म्हणजे पुरावे नष्ट केले आणि मुख्यमंत्र्यांना यांची गंधवार्ताही नव्हती? आणि हे करणारा अधिकारी क्राईम ब्रांचमध्ये कसा असू शकतो’ असा घणाघाती हल्ला त्यांनी सरकारवर केला.
हे गुन्हेगाऱ्यांचं- बलात्काऱ्यांचं आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांचं सरकार आहे
आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना देखील यावेळी लक्ष्य केले. ‘मुंबईचे पोलिस आयुक्त एका एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यासोबत दोन दोन तास कसली चर्चा करतात’ याबाबत त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. ‘हे सरकार किडलेलं- सडलेलं सरकार आहे. हे गुन्हेगाऱ्यांचं- बलात्काऱ्यांचं आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांचं सरकार आहे’ असा थेट निशाणाही त्यांनी सरकारवर साधला आहे.
अधिकाऱ्यांची बदली नाही तर निष्कासन…
‘या प्रकरणात अधिकाऱ्यांची बदली नाही तर निष्कासन केलं पाहिजे. एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याशी मुंबई शहराचे पोलिस आयुक्त दोन दोन चर्चा करतात? मुख्यमंत्र्यांना मनाची नाही पण जनाची असेल, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे अधिकार नसल्याने मुंबई शहराचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा निलंबनाची शिफारस केंद्राकडे केली पाहिजे’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत
यावेळी बोलताना त्यांनी ‘सरकारने सचिन वाझेला सेवेत परत का घेतलं? २०१७ मध्येच त्याच्यावर खंडणीचा गुन्हा होता हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं होतं की नाही? आणि असं असताना क्राईम ब्रांचमध्ये महत्त्वाची शाखा त्याच्या प्रमुख का केलं? या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. अन्यथा हे मुख्यमंत्र्यांनीच केलं असल्याचा जनतेमधला संशय वाढत जाईल.’ अशी जोरदार टिका ठाकरे सरकारवर केली.