वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अंबानी स्फोटक प्रकरणात अटक झाल्यानंतर या विषयात अनेक खळबळजनक गोष्टी पुढे येत आहेत. अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ आणि अर्णब गोस्वामीला अटक करताना वापरलेली स्कॉर्पिओ एकच होती, स्कॉर्पिओ सोबत पाहिली गेलेली पांढरी इनोव्हा ही मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकाच्या नियमित वापरतील गाडी होती. अशा अनेक खळबळजनक गोष्टी पुढे येत आहेत. या प्रकरणात आता शिवसेनेच्या नेत्यांचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.
शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
सचिन वाझे सोबत काही सौदा ठरला होता का? – आमदार अतुल भातखळकर
अर्णबला अटक करताना वाझेंनी वापरली होती ‘तीच’ स्कॉर्पिओ
‘त्या’ इनोव्हा गाडीचे वाझे कनेक्शन
मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा – आमदार अतुल भातखळकर
या चौकशीत वाझे याने स्फोटक प्रकरणात आपला सहभाग असल्याची कबुली दिल्याचे वृत्त ‘एबीपी’ ने दिले आहे. या वृत्तानुसार वाझे यांनी आपण या कटाचा एक छोटा भाग असल्याचे चौकशीत सांगितले आहे. या प्रकरणात वाझे यांनी काही शिवसेना नेत्यांची नावे घेतल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. या शिवसेना नेत्यांनी कटात मोठी भूमिका बजावल्याची माहिती सचिन वाझेंनी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. सचिन वाझे यांनी या प्रकरणात इतर काही पोलीस अधिकाऱ्यांची नावेही घेतली असल्याचे एबीपीच्या वृत्तात सांगितले आहे. “या प्रकरणात मी फक्त हिमनगाचे एक टोक आहे.” असे वाझेंनी या चौकशीत म्हटले आहे.