प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ही चर्चा आहे मुनव्वर राणा नेमके कुठे जाणार याची! या चर्चा सुरु व्हायला कारण ठरले आहे उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमताने सत्तेत येणे.
मुनव्वर राणा हे कायमच त्यांच्या शायरी सोबतच वादग्रस्त विधानांसाठी आणि भाजपा विरोधासाठी चर्चेत असतात. राणा यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या रणधुमाळीत अशीच एक घोषणा केली होती. ‘योगी आदित्यनाथ हे पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तर आपण उत्तर प्रदेश राज्य सोडून जाऊ’ असे राणा यांनी घोषित केले होते.
१० मार्च रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपाने चार राज्यांमध्ये जोरदार कमबॅक केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या असल्या तरी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपा पुन्हा एकदा पूर्ण बहुमनताचे सरकार स्थापन करत आहे. यामुळेच आता मुनव्वर राणा हे आपल्या घोषणेनुसार वागणार का? उत्तर प्रदेश सोडणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
हे ही वाचा:
आज सादर होणार ठाकरे सरकारचा तिसरा अर्थसंकल्प
निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो
निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम
पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!
मुनव्वर राणा यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निकालांनंतर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. तर दुसरीकडे राणा यांच्या मुलीला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राणा यांची मुलगी उरुषा ही उन्नाव येथील पुरवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होती. पण तिला पराभवाचा सामना करावा लागला.