ठाकरे सरकारच्या काळात अनेक विकासप्रकल्पांचा रखडगाडा सुरु आहे. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे मेट्रो प्रकल्प. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेल्या मेट्रो प्रकल्प सध्याच्या घडीला संथगती लाभली आहे. कारशेडच्या प्रश्नावरून आता शहरातील मेट्रो प्रकल्प चांगलेच अडचणीत आलेले आहेत. कांजूरमार्ग कारशेडचा वाद आता न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ठाकरे सरकारची चांगलीच अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारला कारशेडकरता नवीन जागा शोधणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे.
आता ठाण्यातील कारशेडसाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घेतली आहे. तसेच मुंबईतही पहाडी गोरेगाव येथील जागेचा पर्याय पुन्हा तपासून पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास दिलेले आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता, मेट्रो प्रकल्प वेळेत होणे हे नागरिकांच्या सोयीचे ठरणार होते.
सद्यस्थितीमध्ये अनेक भागात मेट्रो प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. परंतु अजूनही कारशेडचा पत्ता नसल्याने आता सर्व मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहेत. मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडल्यामुळे, आता खर्चातही चांगलीच वाढ होणार आहे.भविष्यात मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला तरी कारशेडअभावी अनेक मेट्रो मार्ग रखडण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा :
पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा कालवश
खडसेंसाठी महत्वाचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ
नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा, ठाणे कासारवडवली मेट्रो ४ साठी ठाण्यात मोगरपाडा येथे कारशेड उभारण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.पण स्थानिकांकडून त्याला विरोध होत आहे. जोगेश्वरी कांजूरमार्ग मेट्रो ६ प्रकल्पासाठी पहाटी गोरेगाव येथे कारशेड उभारण्यात येणा होती, पण हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे आढळले. ठाणे मेट्रोचे कारशेडही कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णयही एमएमआरडीएने घेतला होता, पण केंद्र सरकारने ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात आहे. दहिसर येथील कारशेडच्या जागेचा वादही न्यायालयात आहे. त्यामुळे मेट्रोच्या गाड्या तयार आहेत, मार्गिकांचे कामही पूर्ण होत आहे पण कारशेडचा पत्ता नाही.
ठाकरे सरकारकडून कारशेडची जागा अजूनही निश्चित न झाल्यामुळे मेट्रोचा खर्च वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. मेट्रो- ३ प्रकल्पाच्या किमतीत १० हजार कोटींची वाढ झालेली आहे. त्यामुळे येत्या काही काळातच आता हा वाढ झालेला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याची सूचना आता मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. कांजुरच्या जागेचा अजूनही तोडगा नाही त्यामुळे, आरेमधील सध्याची जागा तात्पुरत्या स्वरूपात मेट्रो गाड्या ठेवण्यासाठी वापरण्याबाबतही ठाकरे सरकार विचार करत आहे.