लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडी’ आघाडी कुठे आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. अलिकडेच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. या अधिवेशानातील मुद्द्यावर आणि भूमिकांवर बोट ठेवत संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून काँग्रेसच्या गुजरातमधील अधिवेशानावर भाष्य करण्यात आले आहे. इंडी आघाडीबद्दल काँग्रेसने या अधिवेशनात काहीच भाष्य न केल्यामुळे सामनामधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यावर सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. सामनामधील मांडलेल्या भूमिकेत काय चुकीचे आहे, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. ‘इंडी’ आघाडी गट म्हणून आम्ही सर्व काँग्रेससोबत बांधील आहोत. हुकुमशाही विरोधात लढायचं असेल तर काँग्रेसने तसा पुढाकार घ्यायला हवा. ‘इंडी’ आघाडीतील सर्व सदस्यांशी वारंवार संवाद ठेवायला हवा. हा संवाद आज कमी झालेला आहे, अशा कानपिचक्या संजय राऊत यांनी काँग्रेसला दिल्या.
पुढे संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस मित्र पक्षांशी जशी वागली त्याचे निकाल विधानसभा निवडणुकीत दिसून आले. आपल्याला मोदी शाहांच्या भाजपाला हरवायचे असून आपल्याचं गोतावळ्यातील मित्रांना नाही. यावर आम्ही वारंवार बोललो आहोत. पुढेही एकत्र बसून चर्चा करू, असं संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
पॅलस्टिनी समर्थक महमूद खलिलला करणार अमेरिकेतून हद्दपार
जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एक जवान हुतात्मा
भाजपा-अण्णाद्रमुक आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र!
सामनामध्ये म्हटले आहे की, “काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मोदी- शाह यांच्या गुजरातमध्ये संपन्न झाले. अहमदाबादमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेतले आणि राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली याला विशेष महत्त्व आहे. एरव्ही विरोधकांचा आवाज दडपण्याची एकही संधी न सोडणाऱ्या मोदी- शहांना गुजरातच्या भूमीवरून त्यांच्यावर झालेले हल्ले सहन करावे लागले. ‘घुसकर मारेंगे’ हा भाजपवाल्यांचा आवडता शब्दप्रयोग आहे. राहुल गांधी यांनी अहमदाबादेत घुसून मारले असेच म्हणावे लागेल.”