मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळेच कमी उत्पन्न तसेच मध्यम उत्पन्न गटातील अनेक जण म्हाडाकडे अपेक्षेने पाहतात. त्यामुळेच म्हाडाच्या घरांची सोडत कधी निघते याकडे मुंबईकरांचे लक्ष असते. बॉम्बे डाईंग टेक्स्टाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या तीन हजार ८९४ घरांसाठी मार्च २०२० मध्ये सोडत काढण्यात आली होती.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मार्च २०२० मध्ये तीन गिरण्यांच्या जागेवरील ३८९४ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. याकरता सर्व विजेत्यांना पत्रेही पाठवण्यात आली. परंतु जवळपास ४०० हून अधिक विजेत्यांची पत्रे पुन्हा मंडळाकडे परत आलेली आहेत. म्हणजे दिलेल्या पत्त्यावर विजेते नव्हतेच, त्यामुळेच ही पत्रे परत आली. त्यामुळेच आता म्हाडाच्या समोर प्रश्न आहे की, नेमके करायचे काय? विजेत्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत तर त्यांना हक्काच्या घराला मुकावे लागणार आहे. म्हाडा आता जाहिरातीच्या माध्यमातून, पत्र परत आलेल्या विजेत्यांची यादी तयार करणार आहे. तसेच त्यांना पत्र घेऊन जाण्याची विनंती मंडळाकडून केली जाणार आहे. गेली दोन वर्षे म्हाडाची सोडत निघाली नसल्याने, आता सामान्यांची चिंता वाढली आहे.
हे ही वाचा:
नारायण राणे महाराष्ट्राबद्दल ‘हे’ म्हणाले
देवेंद्र फडणवीसांनी पुसले पूरग्रस्तांचे अश्रु
का दुःखी आहेत एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी?
घरेच शिल्लक नसल्याने सलग १२ वर्षे निघणाऱ्या सोडतीत खंड पडलेला आहे. एकीकडे हक्काचे घर मिळावे म्हणून म्हाडाच्या सोडतीकडे अनेकांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे घर लागूनही विजेते समोर येत नाहीत. त्यामुळेच एकूणच या कारभारावर आता शंका उपस्थित होत आहे. आतापर्यंत पाठवलेल्या तीन हजार ८९४ पत्रांपैकी ४०० हून अधिक पत्रे पोस्टाकडून परत आलेली आहेत. त्यामुळेच खरोखरच हे विजेते आहेत की, अन्य कुणाला घरे विकण्याचा म्हाडाचा डाव आहे हेच आता स्पष्ट होत नाहीये.
सूचना पत्र हे घराचा ताबा मिळवण्यासाठीची पहिली पायरी आहे. त्यानंतर पत्र मिळाल्यानंतरच कागदपत्रे जमा करत विजेत्यांची पात्रता निश्चिती केली जाते. नंतर विजेत्यांना घराचा ताबा दिला जातो. असे असताना ४०० हून अधिक गिरणी कामगारांची पत्रे परत आली आहेत. निश्चित वेळेत कागदपत्रे जमा केली नाहीत तर आता घर रद्द होण्याची भिती आहे.