२०१८ साली देशभर भारतीय जनता पार्टीचा वारू चौफेर उधळला होता. जवळपास दोन तृतीयांश देश हा भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली होता. देशातील तब्बल २१ राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर अथवा मित्रपक्षांच्या साह्याने सत्तेत होती. भारतातील सत्तर टक्के जनता भाजपाचे सरकार असलेल्या राज्यात राहत होती. डाव्यांचा गड मानले जाणारे त्रिपुरा राज्य भाजपाने काबीज केले होते. तर ईशान्य भारतातील सगळ्याच राज्यात भाजपाने आपला सत्ता विस्तार केला होता. संघटनात्मक पातळीवरही भाजपा वाढला होता. १० कोटींपेक्षा अधिक सदस्य असलेली जगातील सगळ्यात मोठी राजकीय संघटना असा मानद त्यांनी प्रस्थापित केला होता. पण असे असले तरी देखील भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समाधानी नव्हते.
अमित शहा जेव्हा विविध माध्यमांशी संवाद साधायचे तेव्हा त्यांना एक प्रश्न वारंवार विचारला जायचा. तो प्रश्न म्हणजे ‘हा भाजपाचा सुवर्ण काळ आहे का?’ पण ते आपल्या उत्तरात ही गोष्ट फार ठामपणे आणि स्पष्टपणे मांडायचे की, भाजपचा हा सुवर्ण काळ नाही! या उत्तराने सगळेच चक्रावून जायचे. पण अमित शहा यांच्या विचारांत मात्र कमालीची स्पष्टता होती. ते सांगत, “ज्या दिवशी पश्चिम बंगाल, केरळ आणि ओरिसा या राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसेल तेव्हा भाजपाचा सुवर्ण काळ सुरू झाला असे मी मानेन’! अमित शहा यांचे हे उत्तर भाजपाची मानसिकता आणि कार्यपद्धती यांचा अंदाज येण्यासाठी पुरेसे आहे. पण मग प्रश्न असा उद्भवतो की भाजपाचा हा सुवर्ण काळ अर्थात हे अच्छे दिन येणार तरी कधी? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर मुळात या पक्षाची धारणा समजून घेणे गरजेचे आहे.
एकेकाळी शेटजी भटजींचा पक्ष किंवा उत्तरेपुरता मर्यादित असलेला पक्ष अशी ओळख असलेली ही संघटना गेल्या ४२ वर्षांच्या कालखंडात देशाच्या कानाकोपऱ्यात आणि समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचली. आजही या संघटनेला अंबानी-अदानींचा पक्ष म्हणत टीका होते. पण त्याचवेळी एका सामान्य बांधकाम कामगाराच्या पत्नीपासून ते घरकाम करणाऱ्या महिलेपर्यंत पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवारही पाहायला मिळतात.
६ एप्रिल १९८० च्या त्या ऐतिहासिक दिवशी, मुंबईच्या सागराला साक्षी ठेवून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली ‘अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा’ ही भविष्यवाणी अशाप्रकारे मूर्तस्वरूप घेईल अशी कल्पनाही कोणी केली नसेल. २ खासदारांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ३०१ खासदारांवर येऊन ठेपला आहे. ४२ वर्षांच्या अविरत साधनेत या संघटनेने अनेक चढ-उतार पाहिले. तेरा दिवसांचे सरकार, एका मताने अविश्वास प्रस्ताव गमावलेले सरकार, तारेवरची कसरत करून चालवलेले वाजपेयींचे युती सरकार, दहा वर्ष पुन्हा विरोधी बाकांवर आणि नंतर सलग दोन वेळा पूर्ण बहुमत घेत सत्तारूढ झालेले मोदी सरकार! हा संख्यात्मक आलेख बघताना खूपच प्रभावशाली वाटत असला तरीही ही तो सहज साध्य झालेला नाही. त्यामागे आहेत लाखो लोकांचे परिश्रम, त्याग, बलिदान, आणि कितीही संकटे आली तरी न ढळलेली पक्षाच्या विचारधारेवरची नितांत श्रद्धा!
१९८० साली लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. पण हे रोपटे वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कधी घाम गाळला आहे, तर कधी रक्त सांडले आहे!वेळ प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन हा यज्ञकुंड धगधगत ठेवला आहे. कुठून येते ही प्रेरणा? कुठून येतो विचारधारेसाठी झोकून देण्याचा हा आत्मविश्वास? याची मुळं पक्षाच्या स्थापनेत, इतिहासात आणि जव्हारच्या वाटचालीत दडलेले आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
हिजाब वाद पेटवायला अल कायदाचे तेल?
अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात
संजय राऊत यांच्यासाठी शरद पवार भेटले नरेंद्र मोदींना
काश्मीरसाठी बलिदान देणारे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, देशावर लादलेल्या आणीबाणी विरोधात जनता पार्टीमध्ये विलीन केलेला जनसंघ आणि त्यानंतर निर्माण झालेली भारतीय जनता पार्टी! भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकदा लोकसभेतील त्यांच्या ऐतिहासिक भाषणात म्हणाले होते ‘सत्ता हमारे लिए साध्य नही है, वह एक साधन है!’ पक्षाने वेळोवेळी हे आपल्या कृतीमधून सिद्ध केले आहेत. पक्षाचे हेच संस्कार शीर्षस्थ नेतृत्वापासून ते अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत झिरपले आहेत.
देशाला परं वैभवापर्यंत नेण्यासाठी, राष्ट्र प्रथम या भावनेतून हिंदुत्वाच्या वाटेवरून मार्गस्थ होताना कार्यकर्त्यांच्या मनात कुठलाच किंतु नसतो. राजकारणासारख्या क्षेत्रात कार्यरत असताना अनेकदा तडजोडी कराव्या लागतात. पण त्या तडजोडी विचारधारेच्या मुद्दावर कधीच नसतात हे भाजपाने आजवर दाखवून दिले आहे. लोकसभेत बोलताना एकदा वाजपेयी म्हणाले होते. ‘आज आम्ही राम मंदिर, ३७०, समान नागरी कायदा या मुद्द्यांवर बोलत नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही! पण याचा अर्थ आम्ही हे मुद्दे सोडले आहेत असा होत नाही’ विचारांशी असलेली एवढी स्पष्टता क्वचितच एखाद्या राजकीय पक्षात आढळून येत असेल.
कारण अटलजींचे हे शब्द नरेंद्र मोदी यांनी सत्तारूढ झाल्यावर खरे करून दाखवले. राम मंदिराचा मार्ग मोकळा होऊन भव्य मंदिर निर्माणाचे कार्य मोठ्या दिमाखात सुरु आहे. ३७० चा प्रश्न निकाली निघाला आहे. तिहेरी तलाकवर निर्णय झाला आहे. सीएए सारखा कायदा आला आहे. इतरही विषयांवर कामे सुरु आहेत. या प्रक्रियेत भाजपाने हे दाखवून दिले की त्यांच्यासाठी सरकार हे महत्वाचे नाही. १९९२ साली जेव्हा बाबरी ढाचा पडला तेव्हा ३ राज्यांमधील भाजपा सरकारे बरखास्त करण्यात आली. २०१८ साली भाजपा स्वतःहून जम्मू-काश्मीर सरकारला लाथ मारून बाहेर पडली आणि २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपाला सत्ता ही उपभोगायला नको असते तर त्याचा उपयोग करायला हवी असते.
बरं पक्षाची कार्यपद्धती अशी आहे की त्यांना कोणतीच निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने चार राज्यांमध्ये केलेले सादरीकरण सगळ्यांनाच प्रभावित करणारे होते. उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या राज्यात पक्ष पुन्हा एकदा संपूर्ण बहुमत घेत सत्तेत आला. पण त्याचवेळी तितकेच महत्व उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या छोट्या राज्यांनाही दिले. त्याआधी तर हैद्राबाद महापालिका निवडणुकीत थेट केंद्रीय नेते प्रचाराला उतरलेले पाहायला मिळाले होते.
आज पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी ममता बॅनर्जींच्या तृणमूलला चांगली टक्कर देत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची पहिल्यांदा प्रचिती आली. तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगलीच मुसंडी मारली. ३ आमदारांवरून भाजपा ७७ आमदारांवर पोहोचला. डाव्यांना धुळ चरणाऱ्या ममता बॅनर्जींना भाजपाने फेस आणला. या निवडणुकीतच भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्ता संपादन करेल असा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला या पातळीवर भाजपाने स्वतःला झोकून दिले होते. तर दुसरीकडे भाजपाने केरळमध्येही ताकद पणाला लावली. मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्रीधरन यांना पक्षाने मुख्यमंत्री पदाचे दावेदार जाहीर केले. निवडणुकीत पक्षाला यश आले नाही. याचा अंदाज पक्षाला असणेही स्वाभाविकच आहे. पण तरी देखील भाजपाने लढण्याची मानसिकता दाखवली. हेच पक्षाचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच पक्ष वाढत जात आहे. ओरिसाचा विचार करायचा झाला तर तिथेही भाजपाचा विस्तार होत आहे. भाजपाच्या मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल पक्ष सध्या सत्तेत असला तरी त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे भाजपाचा होत जाणारा विस्तार त्यांना लवकरच सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतो.
त्यामुळे भाजपाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अमित शहांना अपेक्षित असलेला पक्षाचा सुवर्णकाळ येण्याची शक्यता नक्कीच आहे. पण ते इथपर्यंतच मर्यादित नाही. भाजपाला अभिप्रेत असलेले विचारधारेचे सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत तोवर पक्ष अविरत कार्य करताच राहील यात शंका नाही.