हल्ला करणारा पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल

हल्ला करणारा पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल

महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. तर कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

“पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची २ बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे १ बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

तालिबानी शाहिद आफ्रिदी?

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

या फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.

Exit mobile version