स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी मुलगी ग्रेटा थनबर्ग आणि बंगळूरू स्थित २१ वर्षीय मुलगी दिशा रवि यांच्यातील व्हॉट्सऍप संवाद उघड झाल्यामुळे टुलकिट तपासाला निराळेच वळण प्राप्त झाले आहे. दिशा रवि हिला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा:
ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा संवाद ग्रेटाने तिचे पहिले ट्वीट केल्यानंतर काही वेळातच झाला. या ट्वीटमध्ये तीने जुने टुलकिट जोडले होते. ते नंतर डिलीट करण्यात आले. या संवादात दिशा ग्रेटाला ते टुलकिट ट्वीट न करण्याबद्दल सांगत आहे. यावेळी ती वकिलांशी संपर्कात असल्याचे देखील दिशा म्हणत आहे. दिशाने ती घाबरली असून आपल्यावर युएपीएची कलमे लागण्याची शक्यता असल्याचे देखील सांगितले आहे.
दिशा रविला दिल्ली पोलिसांनी अवैधपणे ते टुलकिट बनविण्याच्या तसेच ते प्रसारित करण्याचा आरोपाखाली अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या मते, ते टुलकिट बनविण्यासाठी एक झूम मिटींग झाली होती. त्यात सुमारे ७० लोकांचा समावेश होता. त्यापैकी अनेकांनी स्वतःची ओळख लपवून ठेवलेली होती.
त्याशिवाय पोलिसांच्या सांगण्यानुसार दिशा ही टुलकीटच्या तपासातील महत्त्वाचा दुवा आहे. काहीच दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी या तपासकार्यात गुगलची मदत घेण्याबाबत गुगलला लिहीले होते. त्याबरोबच या टुलकिटमध्ये दोन इमेल आयडी, एक इन्स्टाग्राम अकाऊंट आणि एक युआरएल देखील या टुलकिटमध्ये लिहीले होते आणि पोलिसांनी त्या प्लॅटफॉर्मकडून देखील यासंबंधीची अधिक माहिती मागवली आहे. पोलिसांनी टुलकिट तयार करणाऱ्या अज्ञाता विरोधात एफआयआर दाखल करून तपासकार्याला सुरूवात केली आहे.