पाचव्यांदा ओदिशाचे मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक यांनी नुकतीच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितिश कुमार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. पटनाईक यांनी नेहमीच सर्व प्रकारच्या राजकीय पक्षांपासून समान अंतर राखले आहे. ते संपूर्ण ओदिशामध्ये लोकप्रिय असून विक्रमी सहाव्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज आहेत.
गेल्या महिन्यात पटनाईक टोकियोला गेले होते. त्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार प्रयत्न करत असून ते सूत्रधाराची भूमिका बजावत आहेत. नवी दिल्लीत या निमित्ताने झालेल्या बैठकीला पटनाईक उपस्थित होते. मात्र त्यानंतर त्यांनी मोदी यांची भेट घेतली. मात्र पटनाईक यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या या एकजुटीच्या व्यवहार्यतेबाबत स्वत: पटनाईक साशंक आहेत.
काँग्रेसने कर्नाटकमध्ये एकहाती विजय मिळवल्यामुळे भाजपला पराभूत करता येऊ शकते, असे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पटनाईक यांनी आतापर्यंत राज्यात काँग्रेसलाच मुख्य विरोधी पक्ष मानले आहे. केवळ सन २०१९मध्ये ही जागा भाजपने भरून काढली. ओदिशा हे भारतातील सर्वांत गरीब राज्य आहे आणि जेव्हा निधीचा विषय येतो, तेव्हा ते याबाबत केंद्र सरकारशी शत्रुत्व पत्करू शकत नाही. त्यामुळे पटनाईक हे कारणाशिवाय भाजपला त्रास देणार नाहीत. तसेच, सन २०२४मध्ये मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी स्थानापन्न होण्यापासून विरोधी पक्ष रोखू शकणार नाहीत, यावरही पटनाईक ठाम आहेत. त्यामुळे त्यांना पराभूत होणाऱ्यांच्या बाजूला जाण्याची इच्छा नाही.
हे ही वाचा:
उमेदवार मृत्यूमुखी पडली, पण मतदारांनी निवडून आणले
बजरंग दलाला देशविरोधी म्हटल्या प्रकरणी मल्लिकार्जुन खर्गेंना नोटीस
चोराला झाला पश्चात्ताप; तब्बल नऊ वर्षांपूर्वी चोरलेले दागिने केले परत
अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार
पटनाईक यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्याचवेळी त्यांनी पटनाईक यांच्यासोबत स्वतंत्रपणेही बैठक घेतली. तर, मोदी आणि पटनाईक यांची भेट ही चार दिवसांपूर्वीच ठरल्याचे समजते. पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर त्यांनी पुरी येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधानांनी हिरवा कंदील दिल्याचे सांगितले. भुवनेश्वर विमानतळावर गर्दी होत असल्यामुळे ओदिशात नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज अधोरेखित होत आहे.
या पार्श्वभूमीवर पटनाईक हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याबाबत उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.