लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला काहीसे यश मिळाले होते. मात्र, यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमतासह प्रचंड विजय मिळवून दिला. विरोधी पक्षासाठी लागणाऱ्या जागाही महाविकास आघाडीला निवडणूक आणता आल्या नाहीत. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस सातत्याने समोर येत होती. शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे एकमेकांवर टीकेच्या तोफा डागल्या. त्यामुळे महाविकास आघाडीमधील बिघाडी चव्हाट्यावर आली. शिवाय गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शरद पवार गट हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर ठाकरे गटाकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला असून त्यांनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
हे ही वाचा :
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी अमृतमयी गो भारती संमेलन, वनवासी कल्याण आश्रमचे कार्यक्रम
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; याचं दिवशी करोडो हिंदूंची झाली होती स्वप्नपूर्ती!
श्रीराम कृपेने मिळाली सजावटीची सौंदर्यदृष्टी!
राजकीय जीवन काही लोकांच्या नशिबात असते, त्यांना काहीही करावे लागत नाही!
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, अखेर आज खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.