पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून विविध एग्झिट पोल्सची आकडेवारी समोर आली आहे. कोणी भाजपा जिंकेल असे सांगताय तर कोणी तृणमूलला झुकते माप देतंय. पण या सगळ्यात आणखीन एक चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे २ मे च्या निकालांनंतर प्रशांत किशोर नेमके काय करणार? कारण भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालमध्ये तीन आकडी मजल मारली तर आपण संन्यास घेऊ असे विधान किशोर यांनी केले होते आणि सगळ्याच एग्झिट पोल्समध्ये भाजपाला १०० पेक्षा अधिक जागा मिळताना दिसत आहेत.
या वेळेची पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक फारच रोमहर्षक होती. साऱ्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे आणि निकालाकडे लागले आहे. ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथून बंगालमध्ये कमळ उमलवण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे. भाजपाला रोखण्यासाठी आणि आपले सत्ता टिकवण्यासाठी ममता बॅनर्जीसुद्धा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यात त्यांना साथ देत आहेत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर. २०१४ ला नरेंद्र मोदी यांच्यासोबत किशोर यांनी काम केले आणि ते एक यशस्वी रणनीतीकार म्हणून नावारूपास आले. त्यानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना विधानसभा निवडणूका जिंकवण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती.
हे ही वाचा:
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या खरंच कमी झाली?
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हमधून चित्र अस्पष्टच!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी
बंगालमध्ये ९६ जागा ठरणार निर्णायक
प्रशांत किशोर हे गेला काही काळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे चाणक्य म्हणून काम बघत आहेत. किशोर यांना खात्री आहे की पश्चिम बंगालच्या निवडणूका ममता बॅनर्जीच जिंकणार. एवढच नाही तर भाजपा बंगालमध्ये तीन आकडी जागा मिळवू शकत नाही असाही दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. भाजपाने तीन आकडी जागा जिंकल्यास आपण आपला व्यवसाय बंद करून राजकीय रणनीतीकार म्हणून कायमचा संन्यास घेऊ अशी घोषणाही किशोर यांनी केली.
पण पश्चिम बंगालच्या सर्व एग्झिट पोल्समध्ये भाजपाला शंभरपेक्षा अधिक जागा दिसत आहेत. त्यामुळे एग्झिट पोल्सनुसार तरी किशोर यांचा दावा चुकीचा ठरताना दिसत आहे. त्यामुळे प्रशांत किशोर आता संन्यास घेणार की यु टर्न घेणार अशी चर्चा रंगू लागली आहे. पण या सगळ्याचा उलगडा २ मे च्या दिवशीच होईल जेव्हा प्रत्यक्ष निकाल आपल्यासमोर येतील.