उद्धव ठाकरे यांना पडला प्रश्न
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना खासदार आणि ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा सवाल उपस्थित केला की, संजय राऊत यांचा गुन्हा तरी काय? संजय माझा जुना मित्र आहे. त्याच्या कुटुंबाची मी भेट घेतली. त्याचा गुन्हा काय, तो पत्रकार आहे, निर्भीड आहे. ज्या पद्धतीने अटक केली ते पाहा. मरण आले तरी मी शिवसेना सोडणार नाही, असे तो म्हणत आहे, त्याचे कौतुक. जे शरण गेलेत ते हमाममध्ये गेलेत. सत्तेचा फेस आहे तोपर्यंत ठीक. फेस उतरला की कळेल.
मी चार स्तंभ मानतो. ही अटक बघितल्यावर मला नितीन गडकरी म्हणाले त्याची आठवण झाली. राजकारण सोडण्याचे वगैरे जाऊ द्या पण राजकारण आता घृणास्पद वाटू लागले आहे. दिलदारपणा पाहिजे. पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेसमोर जा. विचार मांडा. निर्णय जनता घेईल. एका गोष्टीचा अभिमान आहे. अडीच वर्षांत डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा गेली नव्हती. शिवसेनाप्रमुख सांगत पद, सत्ता येते जाते, पण लोकांशी नम्र राहा. मी प्रयत्न केला. आहे. ज्यांच्या डोक्यात हवा गेली. दिवस काळ चांगलाच असतो असे नाही. काळ बदलल्यावर तो तुमच्याशी निर्घृणपणाने वागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली पण नड्डा यांनी घराणेशाहीचा जो उल्लेख केला तो मात्र उद्धव यांनी टाळला. ते म्हणाले की, भाजपासोबत राष्ट्रीय स्तरावर लढणारा राजकीय विचारांचा पक्ष नाही. जे संपले नाही तर संपतील फक्त आपण टिकणार, अशी भाजपाची भूमिका आहे. हे देशाला एकछत्री हुकुमशाहीकडे नेणारे आहे. ओडिसा, तामिळनाडू, शिवसेना हे संपण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेस भाऊ बहिणीचा पक्ष बनला आहे. मग भाजपाचा वंश कुठून सुरू झाला?
हे ही वाचा:
बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’
रोकड प्रकरणी झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांवर झाली ‘ही’ कारवाई
उद्धव म्हणाले की, देशात घृणास्पद राजकारण सुरू आहे. निर्घृण राजकारण होते आहे. जे सोबत येतील, आपले गुलाम होतील ते काही काळ आपले. मग हे गुलाम जातील, नवे गुलाम बनवले जातील. गुलामगिरीकडे वाटचाल सुरू आहे. प्रत्येक पातळीवर विरोध व्हायला हवा.
उद्धव यांनी सांगितले की, प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची. हिंदूंमधये फूट पाडायची. मराठी माणसाला चिरडायचे. हे भाजपाचे कारस्थान आहे.