केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेल फारसे काही आले नाही असा आरोप विरोधकांकडून सतत होत असताना, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना चांगलेच शिंगावर घेतले. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय काय दिले याचा पाढाच फडणवीस यांनी वाचून दाखवला.
अर्थसंकल्पीय तरतूद, विविध विभागांनी विद्यमान प्रकल्पांबाबत यंदाच्या वर्षासाठी केलेली तरतूद, गुंतवणूक, केंद्राची हमी अशा विविध बाबी त्यांनी यातून मांडल्या. शेती आणि सिंचन क्षेत्राची आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, हवामानाधारित शेती प्रकल्पासाठी 672 कोटी रूपये, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन : 232 कोटी रूपये, दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पासाठी 3008 कोटी रूपये, प्रत्येक घराला नळाचे पाणी : 1133 कोटी रूपये, विदर्भ आणि मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळप्रभावित जिल्ह्यांमध्ये सिंचनसुविधांसाठी 400 कोटी रूपये देण्यात आले आहेत. शेतकरी सन्मान निधीसाठी 6823.81 कोटी रूपये आहेत.
पायाभूत सुविधांची माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या उर्वरित 260 कि.मीच्या कामांचा 31 मार्च 2021 पर्यंत कार्यारंभ होईल. ईस्ट-वेस्ट फ्रेट कॉरिडॉर : भुसावळ ते खरगपूर ते डंकुनीला मंजुरी देण्यात आली आहे. रस्ते प्रकल्पांसाठी एकूण तरतूद : 1,33,255 कोटी रूपये असून यात एकूण प्रकल्प : 328, तर एकूण कि.मी : 10,579 इतकी आहे. मुंबई मेट्रो-3 साठी : 1832 कोटी रूपये, पुणे मेट्रोसाठी : 3195 कोटी रूपये, नागपूर मेट्रो टप्पा-2 साठी : 5976 कोटी रूपये, नाशिक मेट्रो प्रकल्पासाठी : 2092 कोटी रूपये, मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी : 441 कोटी रूपये.
विद्यमान 39 रेल्वे प्रकल्प कार्यान्वयन/नियोजन/मंजुरीच्या विविध टप्प्यात आहेत. त्याची एकूण किंमत : 86,696 कोटी रूपये असून एकूण लांबी : 6722 कि.मी. इतकी आहे. यात 2017 कि.मीच्या 16 नवीन लाईन्स (42,003 कोटी रूपये), 1146 कि.मीचे 5 गेज रूपांतरण प्रकल्प (11,080 कोटी रूपये), 3559 कि.मीचे 18 डबलिंग प्रकल्प (33,613 कोटी रूपये) यांचा समावेश आहे. रेल्वेने यंदाच्या अर्थसंकल्पात 7107 कोटी रूपये महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असून ती 507 टक्के अधिक आहे. 2009-14 या काळात महाराष्ट्राला प्रतिवर्षी 1171 कोटी रूपये मिळत असे.
यात अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ (250 कि.मी) : 527 कोटी रूपये, वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ, पुसद (270 कि.मी) : 347 कोटी रूपये, इंदूर-मनमाड व्हाया मालेगाव (368 कि.मी) : 9547 कोटी रूपये, सोलापूर-उस्मानाबाद नवीन मार्ग व्हाया तुळजापूर (84 कि.मी) : 20 कोटी रूपये, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे गुंतवणूक : 7897 कोटी रूपये इत्यादी प्रमुख तरतुदी आहेत.
टॅक्स डिव्होल्यूशनसाठी 42,044 कोटी, वित्त आयोगाचे अनुदान 10,961 कोटी, स्पेशल असिस्टन्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर 529 कोटी, सीएस/सीएसएसचे 13,416 कोटी रूपये इत्यादींचा उल्लेखही त्यांनी पत्रपरिषदेत केला.