उद्धव ठाकरे, शरद पवार आणि वानखेडे… काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि वानखेडे… काय आहे प्रकरण?

सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले समीर वानखेडे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या नियमांमुळे एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभासाठी ५० टक्के उपस्थिती किंवा केवळ २०० लोकांना परवानगी असताना वानखेडेवरील या कार्यक्रमाला मात्र १५०० लोक येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारकडूनच कोरोना नियमांचा भंग होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता वानखेडे येथे जवळपास २ ते ३ हजार मान्यवर उपस्थित राहतील, अशी शक्यता माहिती अधिकारातील कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. शासन निर्णयनुसार ५० टक्के आणि त्यात जास्तीत जास्त २०० लोक एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात जमा होऊ शकतात. परंतु या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री आणि शरद पवार असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे ही वाचा:

दिल्ली सीमेवर तणाव निवळला?

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार

त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही

 

गलगली यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, मागील दिवशी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ४ खेळाडू कोरोनाबाधित असल्यामुळे मुंबई विमानतळ येथून परत पाठविण्यात आले होते. अश्या प्रचंड गर्दीच्या कार्यक्रमामुळे मुंबईत परत कोरोना प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या कार्यक्रमात २०० पेक्षा अधिक प्रेक्षकसंख्या असू नये ही अट पाळावी लागेल. पालिका आणि मुंबई पोलिसांनी जातीने लक्ष देऊन ही गर्दी थांबवायला हवी. कारण ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देऊ शकते.

सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला झालेली ५० वर्षे, दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडेच्या स्टँडला देण्यात येण्याच्या निमित्ताने आणि माधव मंत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तसेच माजी कसोटीपटू गुंडाप्पा विश्वनाथही उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर होईल.

Exit mobile version