राज्याच्या विधानसभेत आज मनसुख हिरेन प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांचा सीडीआर, हिरेन यांच्या पत्नीचा कबुली जबाब आदी गोष्टींचा उल्लेख करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं. त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी हिरेन यांचा सीडीआर फडणवीसांनी कुठून मिळवला? असा सवाल केला. त्यामुळे सभागृहात चांगलीच खडाजंगी उडाली. हा सीडीआर नेमका काय आहे? तो कसा मिळवला जातो?
सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड. हा एक प्रकारचा मेटाडेटा असतो. म्हणजे ते तुमचं एकप्रकारचं संपूर्ण संभाषण असतं. तुम्ही कुणाशी बोललात? कितीवेळ बोललात? किती बोललात? या सर्व माहितीचा रेकॉर्ड म्हणजे सीडीआर असतो. फोन कोणत्या क्रमांकावरून केला गेला आहे. कोणत्या क्रमांकावर केला आहे. किती वेळा कॉल रिसीव्ह केला गेला आहे. कॉल सुरू होण्याची वेळ. कॉलचा एकूण कालावधी याची माहिती ही यात असते. त्याशिवाय किती नंबरांवर मेसेज पाठवण्यात आले. कोणत्या नंबरवरून मेसेज पाठवण्यात आले. किती मेसेज रिसीव्ह करण्यात आले. याचेही डिटेल्स यात असतात.
हे ही वाचा:
कायदेशीररित्या कुणालाही सीडीआर मिळत नाही. सीबीआय, आयटी, इंटेलिजन्स ब्युरो, पोलीस, एनआयए, एटीएस, एनसीबी आणि जेवढ्या चौकशी यंत्रणा आहेत. त्या सर्वांना चौकशीच्या दरम्यान सीडीआर मिळतो. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागते. २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सेबीला सीडीआर ऍक्सेसची परवानगी दिली होती. मार्केटमधील फ्रॉडची चौकशी होण्यासाठी ही परवानगी देण्यात आली होती.