भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी, “हिंगणघाट जळीतकांड घटनेमध्ये जीव गमावणाऱ्या पीडितेला सरकार विसरले आहे.” अशी टीका केली आहे. नेहमी ट्विट करणारे हे सरकार हिंगणघाटच्या पीडितेला आंदराजंली वहायला विसरल्याचेही त्या म्हणाल्या. वाघ यांनी यावेळी बोलताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महिला अत्याचारांच्या घटनांबद्दल सरकार गांभीर नाही. “दिशा कायद्याचं काय झालं?” असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.
“पेट्रोल टाकून ज्या पीडित शिक्षिकेला जाळण्यात आलं, त्या पीडितेच्या वेदनेला सरकार विसरले आहे. नेहमी ट्विट करणारे सरकार साधे श्रद्धांजली देऊ शकले नाही, लेखी आश्वासन दिले होते तेही सरकार विसरले.” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. “महाराष्ट्र सरकार मधील गृहमंत्री बलात्काऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत.” अशी टीकाही भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
हिंगणघाट येथील निर्भया जळीतकांड दुर्दैवी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालंय
एका वर्षात नेमकं काय बदललं? ना कडक कायदे झाले,ना सामाजिक जागृती झाली
आज पुन्हा हिंगणघाटला जात असताना हे प्रश्न मनात अस्वस्थता निर्माण करताहेत @BJP4Maharashtra @bjp4mumbai @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 10, 2021
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता ३ फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र एका आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला.