मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील भांडणे, वाद अत्यंत क्षुल्लक असल्याची कबुली राज ठाकरे यांनी दिली. यानंतर याला उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याकडे राज्याचे लक्ष लागून होते. यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का असा सवालही उपस्थित होत आहे.
राज ठाकरे यांनी दिलेल्या युतीच्या संकेताला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. दादरला भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यात भांडण नव्हतंच, पण तरीही आमच्यातील भांडणं मिटवून टाकल्याचं मी जाहीर करतो. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर यायचं.
हे ही वाचा..
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर काय म्हणाले राज ठाकरे?
संग्राम थोपटेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’! भाजपमध्ये करणार प्रवेश?
“बांगलादेशला जाण्यापूर्वी पुनर्विचार करा!” ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना का दिला इशारा?
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वलसांगकर यांची आत्महत्या
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे त्यांनीही त्यांच्या बाजूने एकत्र येण्याच्या विधानाला हिरवा कंदील दाखवला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे राज्यात नवे राजकीय समीकरण दिसणार का? अशा चर्चांनाही आता वेग आला आहे.