राजकारणाच्या पटलावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे आणि राज्यातील विविध मुद्द्यांना मार्गी लावावे, अशी अनेकांची इच्छा असून याला वाचाही फोडण्यात आलेली आहे. मात्र, एकत्र येण्याच्या चर्चांवर दोन्ही ठाकरेंनी एकमेकांकडे बोट दाखवल्याचे चित्र यापूर्वी होते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट असं वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे. पण, हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.” राज ठाकरे यांच्या या उत्तरावरून राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचे संकेत देऊ पाहत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
“एकनाथ शिंदेंचे राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. पण, मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं,” असं राज ठाकरे यांनी म्हटले.
हे ही वाचा..
संग्राम थोपटेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’! भाजपमध्ये करणार प्रवेश?
“बांगलादेशला जाण्यापूर्वी पुनर्विचार करा!” ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना का दिला इशारा?
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वलसांगकर यांची आत्महत्या
बीएचयूच्या हिंदी विभागावर एबीव्हीपीचा काय आरोप?
महाराष्ट्रासाठी मनसे आणि भाजपा एकत्र येणं गरजेचं आहे का? असाही प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला. यावर राज ठाकरे म्हणाले, “मी महाराष्ट्रासाठी जे करू शकतो, त्याकरता भाजपाबरोबर एकत्र येणं हे राजकीय होईल. पण आमच्या सर्वच बाबतीत एकमत होईलच, असं नाही. आम्ही एकमेकांना हस्तांदोलनही करू शकतो किंवा एकमेकांना पाहून हातही जोडू शकतो. महाराष्ट्र हडपण्याचा जो प्रयत्न दिसतो, त्याविरोधात मी जेव्हा बोलेन तेव्हा हे पक्ष मला किती साथ देतील हे मला माहीत नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.