दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा हिचा मृत्यू अपघाताने झाला नसून बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याचं प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आमदार आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट, आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना फोन केल्याचा दावा भाजपा नेते नितेश राणे यांनी केला होता. यावरही नारायण राणे यांनी भाष्य केले.
नारायण राणे म्हणले की, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरे यांचे त्यांना दोन फोन आले होते. नारायण राणे म्हणाले की, ही घटना घडली होती त्यावेळी एक फोन आला. मिलिंद नार्वेकरांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांना बोलायचं आहे. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकरणात आदित्यचे नाव घेता त्याचा उल्लेख करू नका अशी विनंती करतो. त्यावेळी नारायण राणे म्हणाले की, एका निरपराध मुलीची हत्या केली गेली त्यामध्ये आरोपींना शिक्षा मिळावी असं वाटतं. संध्याकाळी तुमची मुलं कुठे जातात त्याची काळजी घ्या. त्यावर ते म्हणाले की तशी काळजी घेतो पण तुम्हीही सहकार्य करा.
नारायण राणे पुढे म्हणाले की, उध्दव ठाकरे यांचा दुसरा फोन कोरोनाच्या काळात आला होता. त्यावेळी एका हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे बाकी होती. या संदर्भात फोन झाला. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, रुग्णालयासाठी परवानगी मिळेल पण त्या प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका अशी पुन्हा एकदा त्यांनी विनंती केली. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांवर दबाव होता, किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी गेल्या होत्या, असं नारायण राणे म्हणाले. पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा त्यांना मदत करत नव्हते. डॉक्टर बदलले गेले. जो काही प्रकार झाला ते दडपण्यासाठीच झाला. म्हणूनच दबाव कमी झाल्याचं कळल्यावर ते न्यायालयात गेले. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार आरोपींना अटक करून चौकशी करायला हवी होती. तेव्हा मुंबई पोलिसांनी का अटक केली नाही, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा :
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे १७ वर्षे ऑडिटच नाही, बोर्ड बरखास्त करण्याची मागणी
शशी थरूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत भाजपा नेते का म्हणाले, “एकाच दिशेने प्रवास”
औरंग्याची कबर हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून परभणीत तरूणाला मारहाण
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. अनिल परब आणि आक्रमकता यांचा काही संबंध नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. अनिल परब यांनी आतापर्यंत कुणाला कानफटीत तरी मारलंय का असा सवाल त्यांनी केला. चित्रा वाघ यांच्या मागे नारायण राणे आणि भाजपा पक्ष उभा असल्याचे नारायण राणे म्हणाले.