सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार बैठका सुरू आहेत. अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील यांच्याकडे गृहखातं देण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारल्यावर, या बाजारातल्या गप्पा असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तुम्ही गृहमंत्री होणार असल्याच्या चर्चा असल्याचं त्यांना पत्रकारांनी विचारलं. तेव्हा, “या बाजारातल्या गप्पा आहेत. अशा चर्चांवर विश्वास ठेवू नका.” असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि आमदार निधींबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर विषयांवर चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
गेल्या तीन दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. या बैठकीत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलण्यात येणार असल्याची चर्चा झाल्याचं समजतं. त्याबद्दल काय सांगाल, असं पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, “या बैठकांना मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे मला माहीत नाही.” असं वेळ मारून नेणारं उत्तर त्यांनी दिलं.
शिवसेनेची गृहखात्यात ढवळाढवळ वाढल्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. अनिल परब हे गृहखात्यात ढवळाढवळ करत असल्याने शरद पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा, “अशी बातमी माझ्यापर्यंत आली नाही. गृहमंत्र्यांनी अशी तक्रार केलेली आहे, याची मला माहिती नाही, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकत्रित काम करत आहेत. काहीच मतभेद नाहीत. प्रशासकीय बदल्यांचे निर्णय दोन्ही नेते घेत असतात. प्रशासकीय कामाबाबत नाराजी असण्याचं कारण नाही.” असंही त्यांनी सांगितलं.