शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं असून कारवाईची मागणी केली आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, महापुरुषांविरोधात अशी कुणीही वक्तव्य करु नये. संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचा निषेध आहे. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकाबाबत असं अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे गुरुजी आणि कुणीही करु नये. यासंदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती राज्य सरकारकडून केली जाईल. महात्मा गांधी असतील किंवा वीर सावरकर असो, कोणाबाबतही अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा:
दोन दशकानंतर टाटा समूहाचा आयपीओ शेअर बाजारात येणार
कोंढव्यातील दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती
स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त
विधानसभेतही भिडेंच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटले. कॉंग्रेस नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. भिडे यांना अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. भिडेंचं हे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतानाच त्यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.