काय केंद्र केंद्र म्हणताय? राज्याचा बजेट चार साडेचार लाख कोटींचं आहे. तरीही मदत देता येत नाही. केंद्राकडे जेव्हा मदत मागता तेव्हा केंद्र सरकार देत असते. आज तर मुख्यमंत्र्यांनी केंद्राचं कौतुक केलं आहे. आज विनम्र झाले आहेत ते, असं सांगतानाच आम्ही राजकारण करत नाही. राजकारण ज्याला करता येत नाही त्याच्याशी आम्ही राजकारण करत नाही. आम्ही आमच्या तोडीच्या लोकांशी राजकारण करतो, असा चिमटा केंद्रीय मंत्री राणेंनी काढला.
चिपळूणमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवरून नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसाने मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत. मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही, असा हल्ला चढवतानाच राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत, असा उपरोधिक टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
हे ही वाचा:
गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात
लसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?
कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?
पाकिस्तानला ‘वेश्यालय’ म्हणणारे का भेटले नवाज शरीफ यांना?
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका केली. तुम्ही मदत मागायच्या आधीच मोदींनी पाठवली आहे. बाकीची मदत आम्ही मिळवून देऊ. कोणी मागायची गरज नाही. केंद्र कोणतीही मदत बाकी ठेवत नाही. केंद्र सर्व मदत देते, असं सांगतानाच केंद्रालाच सारखी सारखी मदत मागायची असेल तर राज्य कशाला आहे. देऊन टाका राज्य केंद्राला चालवायला. इथे आम्ही वेटिंगवर बसलोय, असं देवेंद्र फडणवीसांकडे पाहून मिश्किल हसत राणे म्हणाले. यावेळी एकच खसखस पिकली.