भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत चांगलीच राजकीय आतिषबाजी केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारासोबतचा फोटो दाखवत चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आधीच अटकेत असलेल्या देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मोहित कंबोज यांनी भाऊबीजेच्या दिवशी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलाच हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनचा असलेला कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणातील खरा मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. तर याच वेळी त्यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या साथीदारासोबतचा एक फोटो दाखवत सवाल उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा:
सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच
अहमदनगरमध्ये रुग्णालयात आग लागून १० जणांचा मृत्यू
कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त
अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
चिंकू पठाण असे या साथीदाराचे नाव असून जानेवारी महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने त्याला अटक केली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांची आणि चिंकू पठाणची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली नसल्याचा फोटो मोहित कंबोज यांनी दाखवला. तर कोरोना काळात लॉकडाऊन असताना दाऊदचा साथीदार चिंकू पठाण हा राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटायला सह्याद्री बंगल्यावर कशासाठी गेला होता? त्यांच्यात कसले डिलिंग झाले? असे सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केले आहेत. तर या भेटीदरम्यान राज्यातील एका मंत्र्याचा जावई देखील उपस्थित असल्याचा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला. या भेटीत ड्रग्स पेडलर कडून किती हप्ता घ्यायचा याचे डिलिंग झाले का? असा सवाल कंबोज यांनी विचारला आहे.
तर सुनील पाटील आणि नवाब मलिक हे देखील ललित हॉटेलमध्ये भेटत होते असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील कंबोज यांनी केली आहे. सुनील पाटील यांच्या नावाने हॉटेल ललित मध्ये एक रूम एकूण आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ बुक होती. नवाब मलिक हे सुनील पाटील यांना भेटण्यासाठी इथे येत असत तेव्हा नवाब मलिक आणि सुनील पाटील यांच्यात नेमकी कोणती चर्चा व्हायची? अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख हे सुनील पाटील यांचे निकटवर्ती असून ते देखील ललित हॉटेलमध्ये पाटील यांना भेटण्यासाठी जात असत. तेव्हा त्यांच्यात काय बोलणी होत होती? असा प्रश्नांचा भडिमार मोहित कंबोज यांनी केला आहे.