पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असताना, काही पराभूत उमेदवारांनी मात्र हार सहन न झाल्याने अजब कारनामे केले आहेत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव सहन न झाल्याने चक्क मतपत्रिका फाडून त्या चावल्या. तर, दुसऱ्या घटनेत एका तृणमूल समर्थकाने मतपत्रिका पळवून नेत तलावातच उडी मारली.
भुरकुंडा पंचायत येथे तृणमूलचे उमेदवार झाकीर हुसैन आणि सुपर्णा दास हे अनुक्रमे अपक्ष उमेदवार शौकत मोंडल आणि माधवी दास यांच्याकडून पराभूत झाले. मात्र त्यांनी पराभव स्वीकारला नाही आणि पुन्हा मतमोजणीची मागणी केली. पुन्हा मतमोजणी सुरू झाल्यानंतर आपला पराभव निश्चित आहे, हे तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांच्या लक्षात आले. त्यामुळे तृणमूलचा समर्थक असलेला मुन्ना मोंडल याने मतपत्रिका घेऊनच पोबारा केला आणि जवळच्या तलावात या मतपत्रिकांसह उडी मारली. या दोन अपक्षांना माकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट या दोन पक्षांचा पाठिंबा होता.
हे ही वाचा:
आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू
उद्धव ठाकरेंनी लोकांना वेळ दिला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव
सप्तशृंगी गडावरून बस ४०० फूट दरीत कोसळली
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात
तर, बुरकुंडा पंचायत येथेच तृणमूल काँग्रेसचे उमेदवार महादेव माती यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला. माकपचे उमेदवार रबिन्द्रनाथ मझुमदार यांनी त्यांचा अवघा चार मतांनी पराभव केला. मात्र महादेव यांनी हा पराभव मानण्यास नकार दिला आणि आपण ५६ मतांनी विजयी झाल्याचा दावा केला. महादेव हे मतमोजणी केंद्रात घुसले आणि त्यांनी मतपत्रिका फाडून त्या चावल्या, असा आरोप माकपतर्फे करण्यात आला आहे.
मंगळवारी या निवडणुकीच्या मतदारांना प्रारंभ झाला. तब्बल ७४ हजार जागांसाठी ही मतमोजणी सुरू झाली पण ती सुरू होताच अनेक मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली. कडक बंदोबस्त असतानाही हिंसाचाराला प्रारंभ झाला. हावड्यात अनेक ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी झाली त्यात एकेठिकाणी बॉम्ब फेकण्यात आला.