आम्ही लवकरच मुंबईला येऊ

आम्ही लवकरच मुंबईला येऊ

एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

आतापर्यंत गुवाहाटीत रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बसलेल्या आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी तिथून ऑनलाइन प्रश्नांना उत्तरे दिली किंवा आपली भूमिका मांडली पण मंगळवारी प्रथमच ते हॉटेलच्या परिसरात आले आणि त्यांनी मीडियाशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. इथे सगळे आमदार अत्यंत आनंदात आहेत. उलट जे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे, त्यातून संभ्रम निर्माण होत असून त्या आमदारांची नावे सांगावीत. आम्ही लवकरच मुंबईला येऊ. काळजी नसावी, असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे हे हॉटेलमधून प्रथमच बाहेर आले आणि मीडियाशी संवाद साधताना त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती केली जात होती, पण त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. आमदारांनी ज्या उद्देशाने हा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावर आमदार ठाम असून कोणताही आमदार नाराज नाही तसेच परतण्याच्या मनःस्थितीतही नाहीत.

शिंदे म्हणाले की, दीपक केसरकर हे आमचे प्रवक्ते म्हणून आमची भूमिका मांडत आहेत. शिंदे म्हणाले की, मी आजही शिवसेनेत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही जात आहोत.

हे ही वाचा:

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

 

एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० पेक्षा अधिक आमदारांसह सध्या गुवाहाटीत बस्तान मांडले आहे. रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये गेला आठवडाभर ते आहेत. शिवसेनेत मात्र त्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. या सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत केलेल्या आघाडीबद्दल नाराजी प्रकट केली आहे. त्यांच्यापासून उद्धव यांनी अलग व्हावे अशी त्यांची मागणी आहे.

Exit mobile version