पवार साहेब विंडो ड्रेसिंग नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा हवा

पवार साहेब विंडो ड्रेसिंग नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा हवा

महाराष्ट्रात सध्या झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्द्यांवर भाष्य तर केलेच, शिवाय, भाजपा अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत तोवर आंदोलन चालू ठेवणार असल्याचा निश्चय देखील त्यांनी बोलून दाखवला.

ते म्हणाले की, “सिंह हे काही अशा प्रकारे आरोप करणारे पहिले नाहीत. यापूर्वी सुबोध जैस्वाल हे पोलिस महासंचालक असताना त्यांनी पोलिसांच्या बदल्यांमधील दलाली, पैशाची देवाणघेवाण यावर एक रिपोर्ट तयार केला होता. हा रिपोर्ट कमिशनर इंटेलिजन्सच्या मार्फत हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि मग मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांकडे गेला. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सुबोध जैस्वाल यांच्यासारखा अधिकारी केंद्राच्या सेवेत निघून गेले. कारण इतकं भयंकर प्रकरण समोर आणल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली नाही. कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणात वारंवार गृहमंत्री आणि त्यांच्या कार्यालयाचे नाव आल्यानंतर एसईएस होम यांच्याकडून परवानगी घेऊन काही फोन सर्वेलंस वर ठेवले. त्याफोनमधून जे मिळालं, त्या धक्कादायक माहितीच्या आधारे एक रिपोर्ट सादर करण्यात आला, परंतु दुर्दैवाने त्यावर काही कारवाई झालीच नाही. कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावरच कारवाई झाली आणि या रिपोर्टमध्ये वारंवार नाव आलेल्या अधिकाऱ्यांना त्याच पदावर पुन्हा नियुक्त करण्यात आलं.” अशी माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावरून शरद पवारांची टोलवाटोलवी

परमबीर सिंग यांच्या पत्राला अनिल देशमुखांचे पत्रकातून उत्तर

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

‘शरद पवार यांची पत्रकार परिषद पाहून आश्चर्य वाटलं परंतु सरकारचे निर्माते ते असल्याने सरकारची सरकारचं रक्षण करणं हे त्यांचं काम आहे.’ असे मत त्यांनी पवार यांच्या पत्रकार परिषदेबाबत व्यक्त केले.

“परमबीर सिंग यांच्या कमिटीच्या रिपोर्ट नुसार वाझे याची नियुक्ती झाली. मात्र पुढचं वाक्य शरद पवार विसरले की, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. आज शरद पवारांनी ज्युलिओ रिबेरो यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी शिफारस केली आहे. या प्रकरणाची म्हणजे कोणते प्रकरण? स्फोटकांचे प्रकरण की गृहमंत्र्यांवरील आरोपाचे देखील, आणि अधिकारावर असलेल्या गृहमंत्र्याची चौकशी निवृत्त पोलिस अधिकारी कशी करणार” असा सवाल देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याबरोबरच शरद पवार यांची पत्रकार परिषद म्हणजे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पवारसाहेब यांना देखील या प्रकरणाबद्दल सांगितल्याचे ते म्हणाले आहेत. मग यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का? असा सवाल देखील त्यांनी केला. त्याबरोबरच त्यांनी दिलेला व्हॉट्सअपचा पुरावा हा दुर्लक्ष न करता येण्याजोगा पुरावा आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केली. त्याबरोबरच ही चौकशी गृहमंत्री पदावर असताना होणं अशक्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याबरोबरच गृहखात्यात शिवसेनेचा हस्तक्षेप वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये नक्की कोणाचा हात आहे? हा देखील प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या बरोबरच सचिन वाझेकडे सापडलेल्या गाड्या गेल्या ६-८ महिन्यात कोणीकोणी वापरल्या याचीही चौकशी व्हायला हवी असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच भाजपाने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन चालू करण्यात आले आहे आणि जोपर्यंत अनिल देशमुख गृहमंत्री पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निश्चय देखील त्यांनी बोलून दाखवला.

Exit mobile version