देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना केले आवाहन
ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातच आपली आणि छगन भुजबळ यांची भेट झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, भुजबळ आज मला भेटायला आले होते. ओबीसी आरक्षणाचा विषय होता. या आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा कसा गोळा करता येईल, हे जाणून घ्यायला ते आले होते. आमचे सरकार असताना मराठा आरक्षणासाठी तो डेटा कसा गोळा केला हे मी त्यांना सांगितले. तो डेटा सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता, हेही मी त्यांना सांगितले. आता त्यांनी पुढाकार घ्यावा. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. त्यासाठी एजन्सी नेमाव्या. आम्ही त्यांना मदत करू. मी वैयक्तिक नोट तयार करून द्यायला तयार आहे. तुम्ही नेतृत्व करा आणि तुम्हाला सहकार्य करू. शेवटी सत्तारुढ पक्षाला नेतृत्व करावे लागते.
समर्थ बूथ अभियानासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या एका प्रशिक्षण बैठकीला आज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे उपस्थित राहून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
हे ही वाचा:
करिनाच्या तिसऱ्या अपत्यामुळे ख्रिश्चन संघटना आक्रमक
एकनाथ खडसेंनी केला होता पदाचा गैरवापर
भारताच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण
सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष
महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चा होऊ लागली होती. त्यावर फडणवीस यांनी या भेटीमागील कारण स्पष्ट केले.
यावेळी अध्यादेश काढून निवडणुका घेता येतील का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणुकीसंदर्भात अधिकार दिले आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून निवडणुकांचे निर्णय घ्यायला सांगण्यात आले आहे. लगतच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आता फेब्रुवारीत महत्त्वाच्या निवडणुका आहेत, त्याच्या आधी हे करणे महत्त्वाचे आहे आणि ते होऊ शकते.
ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक तो इम्पिरिक डेटा केंद्रानेच द्यावा अशी मागणी करत त्याची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून सुरू आहे. मात्र फडणवीस यांनी वारंवार ही जबाबदारी राज्याचीच असल्याचे सांगितले आहे.