पश्चिम बंगालमध्ये थेट मंत्र्यावर बॉम्बहल्ला

पश्चिम बंगालमध्ये थेट मंत्र्यावर बॉम्बहल्ला

पश्चिम बंगालचे मंत्री झाकीर हुसेन हे काल रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यात क्रूड बॉम्बच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे त्यांना कोलकाता येथील सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. “हुसेन यांना गुरुवारी पहाटे कोलकाता येथे स्थलांतरीत करण्यात आले. त्यांना एसएसकेएम हॉस्पिटलमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या डाव्या बाजूला अनेक जखमा आहेत.” अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक आणि मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे उपप्राचार्य ए.के. बेरा यांनी दिली.

हे ही वाचा:

‘जय श्रीराम’ च्या घोषणांमुळे ममता बॅनर्जींनी केले भाषण बंद

बुधवारी रात्री ९:४५ च्या सुमारास तृणमूल कॉंग्रेस सरकारमधील कामगार राज्यमंत्री हुसेन यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब फेकले. अहवाल लिहिण्याच्या वेळी कोणालाही अटक केली गेली नव्हती. या हल्ल्यात हुसेनसह १७ जण जखमी झाले आहेत. त्यातील १२ जणांना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पीडितांना सुरुवातीला जंगीपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी हे मुर्शिदाबादमधून निवडून येतात. मुर्शिदाबाद जिल्ह्यात मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणात असून इथे कायमच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष राहिलेला आहे.

Exit mobile version