चार वर्षांपासून नजरकैदेत असलेले हुरियत (जी)चा प्रमुख मिरवैझ उमर फारूख यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी सुटका करून केंद्र सरकारने मोठा डाव रचला आहे. सुटकेनंतर मिरवैझने लगेचच स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा तसेच, काश्मिरी पंडितांच्या काश्मीर खोऱ्यातील परतीसाठी प्रयत्न करण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल.
काश्मीरचे प्रतिनिधी म्हणून मिरवैझ यांना समोर आणून भारत सरकार पाकिस्तानला कठोर संदेश देऊ पाहात आहे. कारण मिरवैझ हे कधीही पाकिस्तानचे कट्टर समर्थक राहिलेले नाहीत. काश्मीरविषयक तज्ज्ञांच्या मते, मिरवैझ यांचा केवळ काश्मीरमध्येच नव्हे तर मध्य आशियावरही जबरदस्त प्रभाव आहे. फुटीरतावाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या श्रीनगरच्या डाऊनटाऊनमध्ये एकट्या मिरवैझ यांचे सहा लाख समर्थक असल्याचे मानले जाते. काश्मीरच्या मौलवींवरही त्यांची पकड आहे.
‘आम्ही नेहमीच काश्मिरी पंडित खोऱ्यात परतावेत, यासाठी आवाज उठवला आहे’, असे सांगतानाच ‘आम्ही कधीही हा मुद्दा राजकीय केला नाही. हा आमच्यासाठी नेहमीच माणुसकीचा मुद्दा राहिला आहे. या मुद्द्यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे आम्ही मानवाधिकार कार्यकर्त्यांना आमंत्रण दिले आहे. आमचे अनेक नेते, आमची माणसे, महिला आणि पुरुष अनेक वर्षांपासून तुरुंगात आहेत,’ याकडे मिरवैझ यांनी लक्ष वेधले.
सुटकेआधी भाजप प्रवक्त्यांनी घेतली भेट
मिरवैझ यांच्या सुटकेआधी जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्ष आणि भाजप प्रवक्त्या डॉ. द्राक्षां अंद्राबी यांनी नगीनस्थित मिरवैझ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. धार्मिक संस्थेच्या प्रमुख या नात्याने त्यांनी मिरवैझ यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण निर्माण केले आहे. चार वर्षांनंतर सरकारने त्यांची सुटका केली. या दरम्यान कधीही दगडफेक झाली नाही आणि गोळीबार झाला नाही. मिरवैझ यांच्या सुटकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे,’ असे त्या म्हणाल्या.