पाकिस्तानमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांकडून दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका आली आहे. भारतीय प्रशासनाकडून ज्यांना वाँटेड घोषित करण्यात आले आहे, त्यांनी भारतात येऊन कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन भारतीय प्रशासनाने केले आहे.
‘भारतात गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांसंदर्भात ज्यांना न्याय मिळावा, असे वाटते, त्यांनी भारतात येऊन आमच्या कायदेशीर व्यवस्थेला सामोरे जावे, अशी आमची इच्छा आहे, परंतु मी पाकिस्तानमध्ये होत असलेल्या घडामोडींवर भाष्य करू शकत नाही,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
सन २०१५मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हंजला अदनान याची अलीकडेच पाकिस्तानच्या कराचीमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती. हंजला अदनानवर त्याच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूनने १३ डिसेंबर किंवा त्यापूर्वी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिल्याबद्दल विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाने भारत नेहमीच धमक्यांना गांभीर्याने घेतो, असे स्पष्ट केले. अशा धमक्या देणार्या अतिरेक्यांना अधिक महत्त्व देत नाही. आम्ही हे प्रकरण अमेरिका आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे मांडले आहे. दहशतवाद्यांना एखाद्या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांत स्थान हवे आहे, याकडे बागची यांनी लक्ष वेधले.
हे ही वाचा:
पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’
युपीआय पेमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये
“पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांना बळीचा बकरा केलं”
काश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती
कतारमध्ये आठ भारतीयांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेल्या अपीलबद्दलही बागची यांनी परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका मांडली. या प्रकरणावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सर्व कायदेशीर बाजू तपासल्या जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘आमच्या राजदूताला ३ डिसेंबर रोजी तुरुंगात असलेल्या सर्व आठ भारतीयांना भेटण्यासाठी संधी मिळाली. हा एक संवेदनशील मुद्दा आहे. आम्ही जी माहिती देऊ शकतो, ती आम्ही देऊ,’ असे बागची यांनी स्पष्ट केले.