आम्ही मागच्यावेळी पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ केलं होतं. तसा निर्णय आता घेण्याची आवश्यकता आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नियमित कर्ज भरणाऱ्या पूरग्रस्तांना सरकार ५० हजार देणार होतं, पण ही रक्कम अजून दिलेली नाही. सरकारने ही मदत तातडीने दिली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत २०१५ पासून आलेल्या पावसाचा आढावा घेतला. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि मी तीन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात चंद्रकांत पाटीलही जॉईन झाले. तीन जिल्ह्यात २२ ठिकाणी आम्ही भेट देऊन संवाद साधला. दरड कोसळली, भूस्खलन झालं, घरांमध्ये पाणी गेलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. सामान्य माणसांच्या हालअपेष्टा अडचणी समजून घेतल्या, असं फडणवीस यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
कृणाल पांड्यापाठोपाठ ‘या’ दोन खेळाडूंनाही कोरोना
फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?
मुलं जन्माला घाला आणि पैसे घ्या योजना
सीबीएसईचा बारावीचा निकाल आज, काय असणार वेळ?
सांगली, कोल्हापुराच्या बाबतीत विशेष अभ्यास करावा लागेल. २००५ ला महापूर बघितला होता. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात १५९ टक्के पाऊस झाला होता. २०१९ ला भयानक सरासरीपेक्षा ४८० टक्के पाऊस ९ दिवसात झाला होता. यावर्षी सरासरीच्या ५० टक्के पाऊस पाच दिवसात झाला. सांगलीत २१ दिवसात २२१ टक्के पाऊस जास्त झाला. पाऊस खूप मोठ्या प्रमाणात नाही. अलमट्टी धरणातून विसर्गही सुरु आहे. राधानगरीतून तेवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग नाही. जी उच्चपूर रेषा आहे, ती २०१९ च्याही वर आहे. त्यामुळे अतिशय गांभीर्याने या पुराकडे पाहावं लागेल. एवढा मोठा पाऊस न होता, विसर्ग न होता पाणी का साठलं यावर उपाय शोधावे लागतील. कोल्हापुरात ३९६ गावं बाधित, २ लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर, ६० हजारपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालं. प्रशासकीय इमारती, शाळांचं नुकसान. घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे, असं ते म्हणाले.