राज्यात कोरोना काळातील निर्बंध शिथिल करून काही दिवस लोटले नाहीत तोवर परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा एकदा निर्बंध लादले जाऊ शकतील, असे विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्यामुळे जनसामान्य पेचात सापडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत घोषणेआधीच वडेट्टीवारांनी हे संकेत दिल्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील गोंधळाची चर्चा सुरू झाली आहे.
रविवारी पुण्यात बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध घातले जातील, असे विधान केले. त्यावरून वडेट्टीवार चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने अनलॉकची घोषणा करण्याआधीच व़डेट्टीवार यांनी पाच टप्प्यात अनलॉक होणार असे सांगून घोळ घातला होता. त्यानंतर ठाकरे सरकारने याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्रीच अनलॉकचा निर्णय घोषित करतील, अशा शब्दांत वडेट्टीवार यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. पण पुन्हा एकदा निर्बंधांबाबत बोलण्याची घाई वडेट्टीवारांना नडणार आहे.
हे ही वाचा:
पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?
शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध
गुलामाचा स्वाभिमान जागा होण्यासाठी पाच वर्षे का लागली!
पंतप्रधान मोदींनी दिला ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ चा नारा
सध्या राज्यात करोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. १, २, ३ अशा लेव्हल ठेवून त्या जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अनलॉकमुळे आता ठिकठिकाणी गर्दी वाढू लागल्याने आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने परिस्थिती पाहून पुन्हा निर्बंध लावले जातील, असे वडेट्टीवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुढील आठ दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. काही जिल्ह्यांत रुग्णांची संख्या वाढते आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर ही स्थिती आहे. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहून पुन्हा निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसांत यासंदर्भात पाऊल उचलले जाईल.
वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आधी पत्रकारांना माहिती देण्यास उत्सुक असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.