काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना सध्या ओबीसी नेता होण्याची घाई झाली आहे. ते मराठा आरक्षणासंदर्भात काय बोलतात, याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. मराठा आरक्षणासंदर्भात वडेट्टीवारजी काही कायद्याची भाषा बोलतात त्याला काही किंमत नसल्याचेही मेटे यांनी सांगितले.
ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमध्ये ओबीसी नेता होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. वडेट्टीवार मोठे की नाना पटोले मोठे यावरून काँग्रेसमध्ये वाद सुरु झाल्याचा दावा मेटे यांनी केला. त्यामुळे आता या टीकेला विजय वडेट्टीवार काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले होते. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे मराठा उमेदवारांना तुर्तास वगळून नोकरभरती करण्याचे सूतोवाचही वडेट्टीवार यांनी केले होते. परीक्षा झालेल्यांबाबत मुख्य सचिव समिक्षा करतील. त्यानंतर नियुक्त्यांचे आदेश काढू. या नियुक्त्या करताना मराठा समाजाचा निर्धारीत कोटा अबाधित राहील याचा विचार केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
मराठा मूक मोर्चा आता ‘बोलका’ होणार?
मराठा आरक्षण राज्याचा विषय असल्यामुळे मोदी भेटले नाहीत
आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा
तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले?
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी याच प्रश्नावर मूक नव्हे तर बोलका मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यावरही राज्य सरकारने गाढवपणा केला आहे. त्यामुळेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचा मूक मोर्चा नसेल. तो बोलका मोर्चा असेल. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत, असा इशारा मेटे यांनी दिला.