भाजपा तेलंगणा या राज्यात आपला पाया भक्कम करण्याच्या तयारीत आहे. विशेषत: दुब्बका पोटनिवडणूक आणि जीएचएमसी निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर तेलंगणातील पक्ष वाढवण्यासाठी केंद्रीय सत्ताधारी पक्ष कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीये. ताज्या चर्चेनुसार, भाजपा नेते भारतातील सर्वात नव्या राज्यात ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ योजना आखत आहेत.
हैदराबादचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण भाजपामध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे अशी चर्चा आहे. ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळ्या खेळल्या आहेत. त्याने २०१२ साली निवृत्तीची घोषणा केली. २०१३ पासून, तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शन करत आहे आणि बीसीसीआय अंतर्गत समालोचक म्हणूनही काम करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किशन रेड्डी आणि बंडी संजय लक्ष्मण यांच्याशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. लक्ष्मणही पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
टी-२० विश्वचषकाच्या समालोचन संघाचा एक भाग म्हणून तो सध्या दुबईत आहे. भारतात परतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत तो भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चिले जात आहे.
लक्ष्मणला जीएचएमसी क्षेत्रातील एका मतदारसंघातून आमदारकीचे तिकीटही देऊ केले जाईल. मात्र, या वृत्तांवर भाजपा किंवा लक्ष्मण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा:
मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर
आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर
अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?
नवज्योत सिंग सिद्धू (काँग्रेस), मोहम्मद अझरुद्दीन (काँग्रेस), आणि गौतम गंभीर (भाजप) यांसारखे माजी क्रिकेटपटू सध्या राजकारणात सक्रिय आहेत. आता लक्ष्मण या यादीत सामील होऊ शकतो.