‘इंडी आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम असल्यामुळे मतटक्का घसरला!’

अमित शहा यांचा विश्वास

‘इंडी आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम असल्यामुळे मतटक्का घसरला!’

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बंगाल, ओडिशात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील नागरिक सुज्ञ असून ते काळजीपूर्वक मतदान करतील, अशी आशाही व्यक्त केली.

हिंदी पट्टा ही तुमची ताकद आहे. पहिल्या चार टप्प्यांत या भागात देशातील अन्य भागांपेक्षा कमी मतदान झाले. याबाबत आपले काय म्हणणे आहे, असे शहा यांना विचारले असता, त्यांनी याबाबत ठोस भूमिका मांडली. ‘मला पहिल्या टप्प्याबाबत चिंता वाटत होती. मात्र तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू झाल्यानंतर मला जाणवले की विरोधी पक्षांचे मतदार मतदानाला उतरत नाहीयेत. हा निकाल मोदींच्या बाजूने लागेल, हे समजून चुकल्यामुळे ते निराश झाले आहेत. त्यामुळे या कडक उन्हाळ्यात बाहेर जाऊन मत देण्यापेक्षा त्यांनी घरीच बसणे पसंत केले. अर्थात हे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यांनी आपले मत दिलेच पाहिजे. परंतु इंडिया आघाडीच्या मतदारांमध्ये गोंधळ असल्याने मतटक्का घसरला आहे. तर, यंदा पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा यांसारख्या राज्यांत नेहमीच मतटक्का अधिक असतो. मात्र तिथेही मतटक्का घसरला आहे. याचे तुम्ही नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला समजेल की, जिथे काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे, तिथेच मतटक्क्यांत घसरण झाली आहे,’ असे शहा यांनी सांगितले.

सुरुवातीला, तुमचा पक्ष सहजच विजय मिळवेल, असे वाटत होते. मात्र काही परदेशी गुंतवणूकदारांना त्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ज्याप्रमाणे सुरुवातीला जितक्या जागा मिळतील, तितक्या जागा मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी झपाट्याने त्यांचे शेअर विकले. याबाबत तुमचे मत काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी परदेशी संस्था आपल्या देशात नीटसे सर्वेक्षण करत नाहीत, असे स्पष्ट केले. ‘शेअर बाजार वर-खाली होण्याची अनेक कारणे आहेत. आम्ही तळागाळात निवडणूक लढवत आहोत आणि बारीक लक्ष ठेवून आहोत. अशी एकही प्रचारफेरी झाली नाही की ज्यात आमचे ४० ते ५० कार्यकर्ते काय सुरू आहे, याची चर्चा करण्यासाठी बसलेलो नाही. त्यांच्या प्रतिसादानुसार, काळजीचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

संसदेची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे!

‘बाळासाहेबांचा वारसा सांगता आणि काँग्रेसला अभिमानाने मतदान करता?’

देशात पाचव्या टप्प्यात ४९ जागांचे भवितव्य ठरणार; राज्यात अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी रांगा

मणिपूरमध्ये दोन तास चकमक; कुकी दहशतवाद्यांपासून ७५ महिलांची सुटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील सार्वमत म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे, तुम्हाला काय वाटते?, असे त्यांना विचारले असता, दोन्ही आघाड्यांनी त्यांचा पंतप्रधानाचा उमेदवार ठरवला आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला कोण आहे, असे त्यांना विचारले असता, त्यांनी राहुल गांधी यांचे नाव घेतले. कोणीच मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव घेत नाही. आम्ही मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत आणि ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपने सन २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण उधळून लावले होते. मात्र आता पुन्हा हे दिसू लागले आहे, याबाबत त्यांना विचारले असता, मला असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदान हे जातनिरपेक्ष होते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यादवांनी आम्हाला मत दिल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रीय लोक दल आणि नितीश कुमार (संयुक्त) यांच्याशी आघाडी जातीचे समीकरण साधण्यासाठी केली का, असे विचारले असता त्यांनी नकार दिला. ‘नितीशजी आमचे जुने मित्र आहेत. काही माणसांनी गैरसमजातून त्यांना दुसऱ्या बाजूला नेले होते. आम्ही राष्ट्रीय लोकदलाशी युती जातीय समीकरण साधण्यासाठी केलेली नाही. आम्हाला आमचा पक्ष शेतकऱ्याच्या महत्त्वाच्या वर्गापर्यंत पोहोचवायचा होता. याच्याशी निवडणुकीतील विजय अथवा पराभवाचा संबंध नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दक्षिणेकडील राज्यांत भाजपच मोठा पक्ष

दक्षिणेकडील राज्यांतील अपेक्षांबद्दल त्यांना विचारले असता, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, पश्चिम बंगाल आणि ओदिशात पक्ष चांगली कामगिरी करेल, असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये आम्हाला २४ ते ३० जागा मिळतील. ओदिशात आम्ही सरकार स्थापन करू आणि लोकसभेत १७हून अधिक लोकसभेच्या जागा मिळतील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

रोजगारासाठी मोदींनी मोठे काम केले

महागाई आणि बेरोजगारीचा मोठा परिणाम लोकांवर झाला असल्याकडे शहा यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबतही त्यांनी ठोस भूमिका मांडली. ‘जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मतदान केले असेल, तेव्हाही तुम्ही या समस्यांबद्दल ऐकले असेल. नरेंद्र मोदी सरकारने नोकऱ्यांबाबत बरेच काही केले. जेव्हा रोजगाराचा प्रश्न येतो, तेव्हा डावे पत्रकार केवळ सरकारी नोकऱ्यांचीच आकडेवारी रोजगार म्हणून दाखवतात. या दृष्टीने पाहिल्यास आपण दोघेही बेरोजगार आहोत. आम्ही पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहेत. कोणी तरी बांधकामाचे काम करणार. रेल्वे आणि रस्त्यांच्या बांधकामाचा वेग दुपटीने वाढला आहे. गेल्या ७० वर्षांत जेवढे पॉवर ग्रीड उभारले गेले, तेवढे गेल्या १० वर्षांत उभारले गेले’, असे सांगून त्यांनी रोजगारांत वाढ झाली नाही का?, असा उलट प्रश्न विचारला.

Exit mobile version