गुजरात विधानसभा निवडणुकीचे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले. तर आज, ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजेपासून सुरूवात झालीआहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहासुद्धा अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत.
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात आज ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ८३३ उमेदवार रिंगणात आहे. या ९३ जागांपैकी अहमदाबादमधील १६ जागा यंदा भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याची माहिती आहे. गेल्या तीस वर्षांपासून भाजपाने या जागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या निवडणुकीत या ९३ पैकी भाजपाने ५१, तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी गुजरातच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीसुद्धा प्रथमच उतरली आहे.
आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. आज गुजरातमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा असून ८ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.
हे ही वाचा:
लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!
लोखंडी सळीमुळे रेल्वे प्रवाशाचा झाला मृत्यू
हिंदू महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणारा मौलवी अजमलने मागितली माफी
दरम्यान, गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान झाले होते. १९ जिल्ह्यांतील या जागांसाठी ७८८ उमेदवार रिंगणात होते. गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता राखली आहे. या वर्षी जर भाजपाने विजय मिळवला तर तब्बल ३२ वर्ष एका राज्यावर सत्ता केल्याचा विक्रम भाजपाचा होणार आहे.