लोकसभा निवडणुकीचा महानिकाल मंगळवार, ४ जून रोजी समोर येत आहे. सांगलीच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी गुलाल उधळला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपादरम्यान सांगलीच्या जागेवरून कलह निर्माण झाला होता. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला होता. काँग्रेसने यावर जाहीर नाराजी दाखवली होती. त्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता.
विशाल पाटील हे सांगलीतून पूर्वीपासूनच आघाडीवर होते. मोठ्या लीडने ते इतर उमेदवारांपेक्षा पुढे होते. सांगलीत चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून तर महायुतीकडून संजयकाका पाटील निवडणूक रिंगणात होते. अखेर त्यांनी बाजी मारली असून सांगलीची जागा अपक्षच्या वाट्याला गेली आहे.
सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी फेरविचार करण्याचा सल्ला महाविकास आघाडीला दिला होता. दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. ठाकरे गटाने उमेदवार दिलेल्या जागेवर काँग्रेसची ताकद असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत
अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता!
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा धडा!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासून काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने नाराजी व्यक्त करत हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले. सांगलीतील आमदार विश्वजित कदम, विक्रम सावंत यांनी दिल्ली वारीही केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ स्वतःकडेचं ठेवला. महाविकास आघाडीत कटुता निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. यावर विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.