पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. नंदीग्राममध्ये निवडणुकीच्या काळात पुन्हा बंदुका आणि बॉम्ब चालले आहेत. त्यामुळे नंदीग्रामच्या जनतेला पुन्हा २०११ च्या निवडणुकांचे दिवस आठवले आहेत.
“गेल्या ३ रात्री आम्हाला झोपता आलेले नाही.” असे ६२ वर्षीय श्यामल मन्ना यांनी त्यांच्या मातीच्या घराजवळ बंदुकांचे आवाज येत असताना दिली.
२०११ मध्ये तेंव्हाच्या पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये भयंकर रक्तपात झाला होता. ममता बॅनर्जी या नंदीग्राम मधील टाटा नॅनोच्या प्लांट विरुद्ध आंदोलन करत होत्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सत्तेत राहून ३४ वर्ष झाली होती आणि जनतादेखील कम्युनिस्ट सरकारला कंटाळली होती. तेंव्हा ममता बॅनर्जी हा जनतेला चांगला पर्याय वाटला होता. ममता बॅनर्जींनी देखील परिवर्तनाचा नारा दिला होता.
आज २०२१ मध्ये गंगेतून बरंच पाणी वाहून गेलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बंगालमध्ये सत्ता मिळण्याची शक्यता आता नाही. ममता बॅनर्जी या गेली दहा वर्ष सत्तेत आहेत आणि भाजपा आज बंगालमध्ये खूप जास्त ताकदीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आव्हान देत आहे.
२०१४ नंतर आणि विशेष म्हणजे २०१६ च्या निवडणुकांनंतर भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्त्या या मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये सुरु झाल्या. भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान बॉम्बस्फोटदेखील झाले. तर २०२० च्या शेवटी जेपी नड्डा अध्यक्ष असताना त्यांच्या ताफ्यावर देखील हल्ला झाला होता.
तृणमूलचे नंदिग्रामचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी २०२० मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर ममता प्रत्येक वेळी सुवेंदू अधिकारी यांचा उल्लेख गद्दार म्हणून करत आहेत. पूर्व मेदिनीपूर मधील १६ विधानसभेच्या जागांवर सुवेंदू अधिकारींचा चांगला प्रभाव आहे. यामध्येच नंदिग्रामची जागा सुद्धा येते. त्यामुळे नंदिग्राममध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळणार असे दिसत आहे.