औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेचे पडसाद अधिवेशनातही दिसून आले. या घटनेत नागरिकांसह पोलीसही जखमी झाले. जाळपोळीच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. दरम्यान, या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमधील जमावाने घडवलेल्या दंगलप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच दोषींवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित कट होता, असं वाटतं. या भागात दररोज १००- १५० दुचाकी पार्क असतात. मात्र, सोमवारीचं या गाड्या तिथे पार्क करण्यात आल्या नव्हत्या. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली, असा संशय एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
समाजकंटकांनी हॉस्पिटलला लक्ष्य केलं. देवदेवतांचे फोटो जाळले. फायर ब्रिगेडची गाडी जाळली, पोलिसांवर हल्ला केला, हे दुर्दैवी आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा एकानाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच नागपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. जाणीवपूर्वक दंगल घडवून द्वेष पसरवण्याचं काम केलं जातंय, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा :
चेहरा झाकून हातात काठ्या, दगड घेऊन घडवली हिंसा; नागपूरमधील सीसीटीव्ही फुटेज समोर
छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह रील, दोन मुस्लीम तरुणांना अटक!
नागपूर हिंसाचार: पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ८० जणांना घेतलं ताब्यात
इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “औरंगजेब कोणाचा होता? हल्ला करणाऱ्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, ‘छावा’ सारखा सिनेमा पाहिला पाहिजे. औरंगजेबाच्या समर्थनाचा अर्थ देशद्रोह आहे. महाराष्ट्रासाठी औरंगजेबाची कबर ही कलंक आहे, हा कलंक पुसला पाहिजे, ही लोकांची भावना आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. अबू आझमींवरही एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. त्यांना विशिष्ट समाजाची, विशिष्ट मतांची जुळवणी करायची आहे. विशिष्ट मतं घेत असताना समाजात तेढ होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांना निलंबित केलं. जे जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी बाहेर येतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.