पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री दुचाकी स्वार हल्लेखोरांनी बॉम्ब आणि गोळीबार केला. यामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
नारायणगड पोलीस ठाण्याअंतर्गत अभिरामपूर गावात शौभिक दोलुई आणि तृणमूल काँग्रेसचे इतर दोन कार्यकर्ते बसलेले होते, तेव्हाच जवळपास रात्री नऊ वाजता तीन व्यक्ती मोटरसायकलवर आले आणि त्यांच्यावर बॉम्ब फेकला.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढण्यापूर्वी २४ वर्षांच्या दोलुईंवर गोळीबारही केला. त्या तिघांना खरगपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी दोलुई यांना मृत घोषित केले. तर इतर दोन व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मेदिनीपूर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. पण, भाजपच्या जिल्हा अध्यक्षा समित दास यांनी दावा केला की हे तृणमूल काँग्रेसच्या आंतरिक वादाचा परिणाम आहे. राज्यात एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
मेदिनीपूर जिल्ह्यातील मोठे नेते सुवेंदू अधिकारी हे नुकतेच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपामध्ये गेले आहेत. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारींना गद्दार ठरवले होते आणि सुवेंदू अधिकारींविरोधातच मेदिनीपूरमधील नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. यावर सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना ५० हजारांहून अधिक मतांच्या फरकाने हरवण्याची घोषणाही केली होती. या सर्व गोष्टींमुळे, मेदिनीपूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे.